प्राध्यापकांचा आरोप; पदोन्नतीला खीळ
नागपूर विभागाच्या उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांचे पारदर्शकपणे काम सुरू असले तरी त्यांच्यामुळे अनेक प्राध्यापकांच्या वेतनवाढी, पदनिश्चिती आणि पदमान्यतेला खीळ बसली असून त्यांच्या कार्यालयात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप वेळेत वेतनवाढ न मिळालेल्या प्राध्यापकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे.
वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पदोन्नतीची प्रकरणे असो की, प्राध्यापकांच्या भरतीचे प्रकरणे, या फाईल्स वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत. एकदा फाईल सहसंचालक कार्यालयात गेल्यानंतर तिचा निपटारा ४५ दिवसांच्या आत होणे आवश्यक असते. खूप झाले तर एक किंवा दोन महिने. येथे मात्र, वर्षांनुवर्षे फाईल्स प्रलंबित राहतात. वेतनवाढीच्या कामासाठी पीएच.डी. झालेला प्राध्यापक त्यांच्याकडे गेल्यावर त्याला अरेरावीची भाषा ऐकावी लागते. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असू शकते, पण त्यासाठी काही कालमर्यादा निश्चित असावी. पीएच.डी. नोटीफिकेशन दिल्यानंतरही चार-पाच महिने होऊनही वेतनवाढीचे प्रकरण निकाली काढले जात नाही. अशी शेकडो प्रकरणे असल्याचे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. मागील सहसंचालकांच्या काळात कार्यालयात काही गडबडी झाल्या होत्या. अपात्र लोकांना लाभ मिळवून देण्यात आले होते. आता तसे होत नाही. पैसे खाण्याची, पैसे मागण्याची पद्धतच विद्यमान सहसंचालकांनी बंद करून गाडी रूळावर आणली. असे असले तरी वेतनवाढीची किती महिने वाट पाहणार? प्राध्यापक कार्यालयात गेले की त्यांना अक्षरश: हाकलून लावले जाते. प्राध्यापकांचा अशाप्रकारे पायउतार करणे अयोग्य असल्याचे मत नोंदवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा