नागपूर : समाज कल्याण विभागात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न समाज कल्याण विभागाने मार्गी लावला आहे. त्यातूनच समाज कल्याण विभागात प्रथमच ११२ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे आता शिपाई म्हणून काम केलेले कर्मचारी लिपिक बनणार आहेत.
गेली अनेक वर्षे समाज कल्याण विभागात शिपाई या पदावर सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. शिपाई संवर्गातून कनिष्ठ लिपिक या पदावर या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच कनिष्ठ लिपिक संवर्गातून लघुटंकलेखक संवर्गात-१, निम्मश्रेणी लघुटंकलेखक संवर्गातून उच्चश्रेणी लघुलेखक-१ व उच्च श्रेणी लघुलेखक संवर्गातून स्वीय सहाय्यक राजपत्रित-३ या तिन्ही संवर्गातील एकूण ५ कर्मचारी यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने शिपाई संवर्गातून कनिष्ठ लिपिक या पदावर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. समाज कल्याण विभागातील समाज कल्याण निरीक्षक, कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई या वर्ग ३ व वर्ग ४ संर्वगातील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभही देण्यात आला आहे. विभागाअंतर्गत सेवा अर्हताकारी परीक्षेचा प्रश्न देखील आयुक्तांनी मार्गी लावला. जवळपास ६०९ कर्मचाऱ्यांच्या परीक्षा नुकत्याच झाल्या. कर्मचारी सेवा पुनस्र्थापित/नियमित वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागला आहे. नागरिक उन्मुख प्रशासकीय गतिमानता अभियान, कर्मचारी कौशल्य विकास अभियान, कामात सुसूत्रता, गुणवंत कर्मचारी अधिकारी/कर्मचारी, योजनांची मार्गदर्शिका तयार करणे यासारखे उपक्रम समाज कल्याण विभागात आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आले आहेत.
उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना विभागाने प्रोत्साहन दिले आहे. अशाच उत्कृष्ट काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. येणाऱ्या काळात इतर संवर्गाच्या देखील पदोन्नती होतील.
– डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण.