गोंदिया : मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध कठोर भूमिका घेत तिरोडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कारवाईमुळे कर थकबाकी दारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

तिरोडा न.प. अंतर्गत रविवारी ६ थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करताना त्यांच्याकडून सोफा सेट, खुर्ची, वजन काउंटरसह स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली. तिरोडा नगरपरिषदेने थकबाकीदारांना वेळेवर कर भरण्यासाठी अनेक नोटिसा दिल्या आहेत आणि त्यांना कराच्या नोटिसाही दिल्या आहेत. असे असतानाही अनेक वर्षांपासून कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदार याकडे दुर्लक्ष करत असून, याकडे नगर परिषद प्रशासनाने नियमानुसार थकबाकीदारांची यादी तयार करून विहित मुदतीत कर भरण्यास सांगितले आहे. करिता नोटीस दिली होती. नगरपरिषदेचे असे १९ थकबाकीदार आहेत, ज्यांच्यावर १२ लाखांहून अधिक कर अनेक वर्षांपासून थकीत आहे.

नियमानुसार कारवाई

वारंवार माहिती देऊनही कर थकबाकीदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नियमानुसारच ही जप्तीची कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती तिरोडा नगर परिषदेचे कर निरीक्षक रुतुंजय कांबळे यांनी दिली. वेळेवर कर भरून नगरपरिषदेच्या विकासकामांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गोंदिया नगर परिषदेकडून ८८ मालमत्ताधारकांना नोटीस

गोंदिया नगर परिषदेच्या मालमत्ता करापोटी ९ कोटी ४२ लाख रुपये थकीत आहेत. मालमत्ता कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांना वारंवार सूचना देऊनही ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे नगर परिषदेने आता मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. याच अंतर्गत शहरातील बड्या ८८ मालमत्ताधारकांना नोटीस बजावली आहे.

३५ टक्क्यांपेक्षा कमी मालमत्ता करवसुली झाल्यास नगरविकास विभाग नगर परिषदेला दिल्या जाणाऱ्या अनुदानाला कात्री लावते. गोंदिया नगर परिषदेसाठी मालमत्ता करवसुली ही नेहमीच डोकेदुखीची बाब आहे. शहरात सद्यःस्थितीत ८४ हजारांवर मालमत्ताधारक आहेत; पण नगर परिषदेच्या रेकॉर्डवर केवळ ४५ हजार मालमत्ताधारकांचीच नोंद आहे. शहरातील मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. पण त्याचे घोडे नेमके कुठे अडले आहे हे कळण्यास मार्ग नाही. परिणामी नगर परिषदेवरील आर्थिक भार वाढत आहे. सन २०२५-२६ करिता नगर परिषदेला ९ कोटी ४२ लाख रुपयांच्या मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे; पण आत्तापर्यंत केवळ २४ टक्केच मालमत्ता करवसुली झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नगर परिषदेने शहरातील बड्या थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांना नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. याच अंतर्गत आतापर्यंत ८८ मालमत्ताधारकांना न.प.ने नोटीस बजावली आहे. नोटीसनंतरही मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

प्रशासकराजमुळे वचक नाही

गोंदिया नगर परिषदेची निवडणूक गेल्या ३ वर्षांपासून रखडली आहे. परिणामी मागील ३ वर्षापासून नगर परिषदेत प्रशासकराज आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कुणाचाच वचक नसल्याने नगर परिषदेच्या इतर कामावर परिणाम होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

… तर मालमत्ता जप्तीची कारवाई

थकबाकीदारांनी नोटीस बजाविल्यानंतरही मालमत्ता कराचा भरणा केला नाही तर पोलिस संरक्षणात त्यांची मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदारांनी वेळेत कराचा भरणा करावा, असे आवाहन गोंदिया नगर परिषदेचे कर अधिकारी राजेश सव्वालाखे यांनी केले आहे.