अकोला : अकोला महापालिका प्रशासनाने अभय योजना राबवून मालमत्ता कर वसुलीवर भर दिला. याला अकोलेकर मालमत्ताधारकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला असून तब्बल ८५.१३ कोटी रुपयांची थकबाकी वसुली ३१ मार्चपर्यंत करण्यात आली आहे. खासगी कंपनीपेक्षा महापालिका कर्मचाऱ्यांनी अधिक चांगले परिणाम दिले आहेत.

अकोला महापालिकेत राज्यातील एकमेव कर वसुलीच्या कंत्राटीकरणाचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, मालमत्ता कर वसुलीचा अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी स्वाती इंडस्ट्रिजचा करार रद्द केला. त्यानंतर मालमत्ता कर वसुलीची जबाबदारी पुन्हा एकदा महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देण्यात आली.

अकोला महापालिकेचा एकूण १९६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत होता. तो वसूल करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे निर्माण झाले. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी शास्तीमध्ये सूट देण्याची अभय योजना राबविण्यात आली. याला मालमत्ता धारकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. १३ महिन्यांत स्वाती इंडस्ट्रिजने ३३ कोटी रुपयाची मालमत्ता कराची वसुली केली होती. या करारानुसार कंपनीला ८.३० टक्के कमिशन देण्यात येणार होते.

कंपनीच्या संथ कारभारामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी कंपनीचा कंत्राट रद्द केल्यानंतर मनपाच्या यंत्रणेने वसुलीला वेग दिला. ३१ मार्चपर्यंत शहरातील मालमत्ता धारकांनी ८५.१३ कोटी रुपयांचा थकीत कर भरला आहे. या वर्षी मालमत्ता कराची विक्रमी वसुली करण्यात आल्याचे सहा.आयुक्त विजय पारतवार यांनी सांगितले.

उर्वरित ११०.८७ कोटी रुपये वसुलीचे आव्हान

मालमत्ता कर भरणा करण्यामध्ये ३१ मार्चपर्यंत शास्ती अभय योजनेचा लाभ नागरिकांना मिळाला. आता त्याचा कालावधी संपल्याने १ एप्रिलपासून व्याजासह नागरिकांना मालमत्ता कर भरावा लागणार आहे. ८५.१३ कोटी रुपये वसूल झाल्याने आता उर्वरित ११०.८७ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे राहणार आहे.

आगामी काळात चालू व थकीत कर वसुली

महापालिकेच्या यंत्रणेने अथक परिश्रमातून मालमत्ता कर वसुली केली आहे. मालमत्ता धारकांच्या सुविधेसाठी अभय योजना राबविण्यात आली. आगामी काळात देखील चालू व थकीत कर वसुली वेगाने करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.