लोकसत्ता टीम
नागपूर : औद्योगिकदृष्ट्या मागासलेला, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याने संपूर्ण जगात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रदेश अशी ओळख मिळालेल्या विदर्भात निवडणुकीच्या काळात मात्र पैशाचा पूर येत असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या जप्तीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
१५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत राज्य व केंद्र शासनाच्या विविध तपास यंत्रणांनी राज्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत बेकायदा रोख रक्कम, मद्य आणि अन्य वस्तूसह ४९३ कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यात विदर्भातील ११ जिल्ह्यातील ६१.१५ कोटींच्या मालमत्तेचा समावेश आहे.
आणखी वाचा-नागपुरात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिग्गजांच्या सभा, कोण कोण येणार?
मागास विदर्भ म्हणून सर्वदूर परिचित विदर्भात प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो. तपास यंत्रणा डोळ्यात तेल घालून निगराणी करीत असली तरी मोठ्या प्रमाणात रोख व मद्य शहरात आणले जाते. पश्चिम विदर्भ हा शेतकरी आत्महत्या आणि नापिकीसाठी ओळखला जातो तरी तेथील पाच जिल्ह्यात १५ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यात बुलढाणा (६ कोटी ५९ लाख), अकोला (२ कोटी २९ लाख), वाशीम (५४ लाख), अमरावती (१ कोटी ८८ लाख) आणि यवतमाळ (२ कोटी ५३ लाख) आदीचा समावेश आहे.
पूर्व विदर्भात गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात दारू बंदी आहे. मात्र, या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जाप्त करण्यात आला. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात एकूण ४५ कोटींहून अधिकची विविध प्रकारची मालमत्ता जप्त करण्यात आली. त्यात वर्धा(३ कोटी ७४ लाख), नागपूर (३७ कोटी १६ लाख), भंडारा (१ कोटी२९ लाख), गोंदिया (१ कोटी ६२ लाख) आणि चंद्रपूर (२ कोटी३४ लाख) आदींचा समवेश आहे.
आणखी वाचा-पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
गरीब विदर्भातील श्रीमंतीचे प्रदर्शन
दोनच दिवसांपूर्वी नागपूरमध्ये उच्चप्रतिच्या मद्याचा साठा जप्त करण्यात आला होता. रविवारी वर्धेजवळ एका ट्रकमध्ये कोऱ्या करकरीत नोंटाचा चुरा आढळून आला होता. तो ट्रक पेटल्याने तो राख झाला. तसेच रविवारीच मोठ्या संख्येत अपक्ष उमेदवाराने वाटप करण्यासाठी आणलेल्या धान्याच्या किट्स पोलिसांनी जप्त केल्या होत्या. एकूणच निवडणूक आचारसंहितेच्या निमित्ताने पोलिसांनी केलेल्या कारवाईतून गरीब विदर्भातील श्रीमंतीचे प्रदर्शन दिसून आले.
© The Indian Express (P) Ltd