चंद्रपूर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी २०२२ ला ९ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. अनेक बैठक व चर्चा होऊन आता सारस संवर्धन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातून नामशेष झालेला सारस पक्षी पुन्हा चंद्रपुरात आणण्यात यावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वन्यजीव सप्ताहनिमित्ताने येथे प्रयत्न सुरू झाले आहे. गोंदियाच्या सेवा संस्थेने अभ्यास करून सारस पक्षी विदर्भातून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची नोंद केली होती. त्याची दखल घेवून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ जोनवारी २०२२ ला दिलेल्या आदेशानुसार भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे लुप्त होणाऱ्या सारस क्रेन पक्षाच्या संवर्धनासाठी सारस संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली.
या समितीद्वारे जिल्ह्यातील पक्षांचे अस्तित्व, स्थिती, ऱ्हासाची कारणे आणि संरक्षणासाठी आराखडा तयार करण्यात आला. विविध विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यात एकही सारस पक्षी गेल्या २ वर्षापासून आढळला नसल्याचे लक्षात आल्यामुळे संस्थेचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी सारस पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात आणण्यात यावा, असा प्रस्ताव समितीसमोर मांडला. त्यानुसार हा प्रस्ताव समितीने न्यायालयाकडे पाठविला आहे.इथे लहान पिले आणायची, जोडी आणायची की कृत्रिमपणे अंडी उबवायची याचा अभ्यास, आणि वन्यजीव बोर्डाच्या मान्यतेनंतरच हा पक्षी पुन्हा आणण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकाही सारस पक्षी आढळला नाही. परंतु, भविष्यात हा पक्षी आला तर त्याला लागणारा अधिवास सुरक्षित राहावा ह्यासाठी समितीने उपाय योजना सुचविल्या आहेत.चंद्रपूर येथे २० वर्षापूर्वी जुनोना येथे ४ सारस पक्षी होते. १० वर्षापूर्वी केवळ १ पक्षी उरला होता. आता हा एकमेव सारस अनेक वर्षे राहून तो सुद्धा मागील वर्षीपासून दिसेनासा झाला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना विचारणा केली असता सारस ‘कॉन्झरवेशन प्लॅन’ तयार केला असल्याची माहिती दिली. सारस पक्षी येथे आणता येत असला तरी त्याला चित्त्याप्रमाणे ठेवता येणार नाही, असेही ते म्हणाले.