लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : बियर शॉपी परवान्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारणारे दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.

तर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने खरोडे व खताळ यांना जामीन मंजूर केला तर पाटील यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे.

आणखी वाचा-नागपूरः गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग; एक हवालदार बडतर्फ, दोन पोलीस निलंबित

घुग्घुस येथील गोदावरी बियर बार व रेस्टारंटचे संचालकांनी बियर शॉपी परवान्यासाठी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्या निर्देशानुसार एक लाख रूपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले यांच्याकडे दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर मंगळवार ७ मे रोजी सापळा रचून खारोडे व खताळ या दोघांना एक लाखाची लाच स्वीकारतांना अटक केली होती.

आणखी वाचा-नागपूर : ध्वनिप्रदूषण करणाऱ्या बुलेटधारकांविरुद्ध मोहीम, मॅकेनिकवरही पोलीस कारवाई

त्यानंतर प्रतिबंधक विभागाने या दोघांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोघांची १० मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. दोन्ही अधिकारी ४८ तासापेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्याने व त्यानंतर पुन्हा तीन दिवस कारागृहात राहिल्याने उत्पादन शुल्क विभागाने खारोडे व खताळ या दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच ७ मे पासून फरार असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एसआयटी चौकशीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे तर आमदार सुधाकर अडबाले यांनीही तिन्ही अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी गृह मंत्री यांच्याकडे केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proposed suspension of excise superintendent sanjay patil rsj 74 mrj