नागपूर : वर्धा मार्गावरील हॉटेल प्राईडमध्ये रशियन मुलींकडून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. गुन्हे शाखेने सापळा रचून छापा घातला असता तीन मुलींना देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दोन दलालांना अटक केली व त्यांच्याकडून १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहव्यापारातील मोठा दलाल बंटी ऊर्फ बिलाल अहमद (३७, शंभूनगर, मानकापूर) आणि राजकुमार गडेलवार (४०, कामठी रोड, सदर) हे गेल्या काही दिवसांपासून विदेशी मुलींकडून देहव्यापार करीत होते. बंटीने रशिया आणि उझबेकिस्तान यासह अन्य काही देशातील तरुणींना मुंबईत बोलावले होते. मुंबईतील पोलिसांच्या कारवाईचा धोका लक्षात घेऊन चार दिवसांपूर्वी एक रशियन आणि दोन दिल्लीतील तरुणींना त्याने विमानाने नागपुरात आणले. हॉटेल प्राईडमध्ये ठेवले. ग्राहकांना तो थेट हॉटेलमध्येच पाठवत होता.
हेही वाचा – वाघांची शिकार आणि १७ मिश्यांची तस्करीही, पण…
प्राईड हॉटेलमध्ये विदेशी तरुणींकडून देहव्यापार करवून घेतल्या जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ निरीक्षक सारिन दुर्गे यांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवला. त्याने दलाल बंटीची भेट घेतली. बंटीने १० हजारात सौदा केला आणि रशियन युवतीच्या खोलीत पाठवले. बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी लगेच सापळा रचून तीनही मुलींना ताब्यात घेतले. बंटी अहमद आणि राजकुमार गडेलवार याला अटक केली. तीनही तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले असून पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे.