नागपूर : राज्यात देहव्यापार झपाट्याने वाढला असून गेल्या ११ महिन्यांत मुंबईनंतर सर्वाधिक देहव्यापाराच्या कारवाई नागपुरात करण्यात आल्या. मुंबईत २६ देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापे घालून ८० महिलांना ताब्यात घेतले तर नागपुरात ६६ तरुणी देहव्यापाराच्या दलदलीत सापडल्या. ही धक्कादायक माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरुन समोर आली आहे.
राज्यातील ‘सेक्स रॅकेट’चे क्रेंद म्हणून मुंबई नंतर उपराजधानीला ओळख निर्माण झाली आहे. राज्यात देहव्यापाराच्या माध्यमातून वर्षाला कोट्यवधीची उलाढाल होते. देश-विदेशातून तरुणी देहव्यापाराच्या ‘करार’वर राज्यात येत असतात. राज्यात कायदा व सुव्यवस्थेसह महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा सरकारने केला होता. मात्र, राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहेत. यासोबतच राज्यातून अल्पवयीन मुलींचे आणि तरुणींसह विवाहित महिलांचे बेपत्ता होण्याच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.
हेही वाचा : माजी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जंगल घटले
बेपत्ता झालेल्या अनेक तरुणी-महिला थेट देहव्यापारात ढकलल्या जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. महिला सुरक्षेवर भर देण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष प्रयत्न केल्या जात नसल्यामुळे राज्यात महिलांवरील अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात देहव्यापार वाढला असून मुंबई, नागपूर आणि पुण्यात सर्वाधिक देहव्यापार केल्या जात असल्याची माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावर आहे. मुंबईमध्ये पोलिसांनी २६ ठिकाणी सुरु असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापा घातला. या छाप्यात ८० तरुणी आणि महिलांना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. यामध्ये १३ व १४ वर्षांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. तरुणींकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या ३५ महिला व पुरुष दलालांना अटक करण्यात आली. नागपुरात २५ देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापे घातले. त्यात ६६ तरुणी-महिलांना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. त्यात १४ ते १५ वर्षे वयोगटातील ४ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
हेही वाचा : राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
स्पा-ब्युटी पार्लरच्या नावावर सर्वाधिक कुंटणखाने
मुंबई, नागपूर आणि पुण्यात ब्युटी पार्लर आणि स्पा-मसाज पार्लरच्या नावावर सुरु असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर सर्वाधिक धाडी घालण्यात आल्या आहे. मुंबईत ८० पैकी ४२ तरुणी-महिला ब्युटीपार्लरमध्ये देहव्यापार करताना साडपल्या. नागपुरात २५ धाडीपैकी १४ धाडी ब्य़ुटी पार्लर आणि स्पामध्ये घालण्यात आल्या. ६६ पैकी ४१ तरुणी या ब्युटी पार्लरमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसोबत पकडल्या गेल्या. त्यामुळे आता देहव्यापारासाठी दलालांनी ब्युटी पार्लर-स्पा सेंटरला लक्ष्य केले आहे.
देहव्यापाराच्या अड्ड्यावर गुन्हे शाखा वेळोवेळी धाडी घालते. देहव्यवसायाच्या दलदलीत अडकलेल्या मुली-तरुणींना बाहेर काढून त्यांच्या हाताला काम मिळावे,यासाठीसुद्धा पोलीस प्रयत्न करतात. देहव्यापार करणाऱ्या ६० वर दलालांना पोलिसांनी अटक केली आहे.
राहुल माकणीकर (पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, नागपूर पोलीस)