नागपूर : शेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीला नवीन कपडे घेऊन देण्याच्या मोबदल्यात आंबटशौकीन ग्राहकाशी शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य करून देहव्यापारात ढकलण्यात आले. त्या मुलीला देहव्यापार करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली.
फरीदा मोहम्मद खान (हुडको कॉलनी) आणि धनश्री ऊर्फ सोनी हिरामन वाघमारे (कबीरनगर, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी स्विटी (१२) ही सातव्या वर्गात शिकते. ती लहान असतानाच तिची आई सोडून गेली. तिचे वडिल एका दुकानात काम करतात. घरची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. तिच्या घराशेजारी धनश्री वाघमारे ही राहते. स्विटीला घालायला कपडे नाहीत आणि नवीन कपडे घेण्यासाठी ती वडिलांकडे हट्ट करीत असल्याची माहिती धनश्रीला होती. गेल्या काही दिवसांपासून धनश्री ही स्विटीला घरी बोलवून जाळ्यात ओढत होती. धनश्रीने तिला नवीन कपडे घेऊन देण्याच्या मोबदल्यात एका युवकाशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. ती नवीन कपड्यासाठी तिच्या आमिषाला बळी पडली.
हेही वाचा – गोंदिया: बॉल पासिंग खेळत असताना वाद झाला अन् … वॉटर पार्कमध्ये तरुणाला बेदम मारहाण
धनश्रीने फरीदा खान नावाच्या मैत्रिणीला फोन केला. तिला स्विटी देहव्यापारासाठी तयार असल्याचे सांगून ग्राहक शोधण्यास सांगितले. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता फरीदा आणि धनश्री यांनी स्विटीला एका खोलीत नेले. तेथे एका ग्राहकाच्या स्वाधीन केले. या दरम्यान पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून छापा घातला. या छाप्यात १२ वर्षीय मुलीला ताब्यात घेतले. धनश्री व फरीदा यांच्याविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शारीन दुर्गे यांच्या पथकाने केली.