नागपूर : वर्धा रोडवरील स्वामी विवेकानंद चौकातील एका आलीशान इमारतीत स्पा व युनिसेक्स सलूनच्या नावावर देहव्यापर करण्यात येत होता. एका १६ वर्षीय मुलीला आंबटशौकीन ग्राहकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी बाध्य करण्यात येत होते. या सलूनवर गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री छापा घातला. अल्पवयीन मुलीची सुटका केली तर दोन दलालांना अटक केली. दीपक मदन कटवते (फोर्थ क्लास बिल्डींग, सिव्हील लाईन, आमदार निवास) आणि प्रवीण रामभाऊ कान्होलकर (४६, बोरगाव रोड, गोरेवाडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पीडित १६ वर्षीय मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेते. तिच्या वडिलांचे निधन झाले असून आई धुणी-भांडी करते. तिचे शिक्षण बंद पडू नये म्हणून तिने एका ब्युटीपार्लरमध्ये काही दिवस काम केले. तेथे आरोपी प्रवीण कान्होलकर याला ती मुलगी दिसली. त्याने तिच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेतला. त्याने तिला काही ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवल्यास जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवले. त्याने हेअर डायव्हीन स्पा-युनिसेक्स सलूनमध्ये तिला देहव्यापार करण्यासाठी ठेवले. तेथे आणखी काही तरुणी, महिला आणि अल्पवयीन मुलीसुद्धा ग्राहकांच्या मागणीनुसार देहव्यापार करीत होत्या.
हेही वाचा >>> चंद्रपूर : किडनी दान करून ‘आई’ने विवाहित मुलीला दिले जीवनदान
सलूनमधील व्यवस्थापक आरोपी दीपक कटवते हा आंबटशौकीन ग्राहकांना अल्पवयीन मुलींना पुरवित होता. या प्रकाराची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चौधरी यांना मिळाली. त्यांनी मंगळवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून १६ वर्षांच्या मुलीची मागणी केली. पाच हजार रुपये दिल्यानंतर पीडित मुलीला त्याच्यासोबत एका खोलीत बंद करण्यात आले. त्याने लगेच पोलिसांना इशारा दिला. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा घालून दोन्ही दलालांना अटक केली. तर अल्पवयीन मुलीची सुटका केली.