लोकसत्ता टीम
नागपूर : खामला परिसरात ‘अमनजेना स्पा-मसाज सेंटर’मध्ये अचानक ग्राहकांची गर्दी वाढायला लागली. तेथे तरुणींसह अल्पवयीन मुलीसुद्धा यायला लागल्या. त्यामुळे संशय आल्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून स्पा-मसाज सेंटरच्या नावावर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटवर छापा घातला. पोलिसांनी देहव्यवसाय चालवणाऱ्या ३ आरोपींना अटक करून त्यांच्या तावडीत सापडलेल्या ४ मुलींची सुटका केली.
मनीषा उर्फ महिमा सुरेश फरकाडे (३५) रा. हिलटॉप, रामनगर, सरोज मनोज शर्मा (३८) रा. सोनबानगर, वाडी आणि नीलेंद्र महेश उके (३४) रा. कंट्रोलवाडी, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे लक्ष्मीनगर चौक ते आठ रस्ता चौकादरम्यान असलेल्या एका मसाज सेंटरमधील तरुणींनी दुपारीच पळ काढल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा-शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष; जेष्ठ नागरिकाची अडीच कोटींनी फसवणूक
मनिषा फरकाडे आणि सरोज शर्मा यांनी खामलाच्या सत्यसाई अपार्टमेंटमध्ये ‘अमनजेना स्पा सेंटर’ उघडले होते. स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या कृत्यावर स्थानिक नागरिकांना संशय होता. एका नागरिकाने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पडताळणीत ही माहिती खरी ठरली. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पंटरला ग्राहक बनवून तेथे पाठवले. पंटरने आरोपींशी तरुणीचा सौदा होताच पोलिसांना इशारा दिला. इशारा मिळताच पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली असता चार मुली मिळाल्या. चौकशीत वरील आरोपी पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. चारही मुली या नागपूरच्याच आहेत. पोलिसांनी मनीषा, सरोज आणि नीलेंद्र विरुद्ध पीटा अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. ही कारवाई उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लक्ष्मण चवरे, सचिन बढीये, लता गवई, शेषराव राऊत, अश्विन मांगे, नितीन वासने यांनी केली.
आणखी वाचा-विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री गोविंद शेंडे म्हणतात, “आरोप चुकीचे, चार हजार संतांना…”
तरुणींचे आर्थिक शोषण
सेक्स रॅकेटमध्ये काम केल्यास प्रतिग्राहक एक हजार रुपये देण्याचे आमिष सरोज आणि मनिषा या देत होत्या. मात्र, प्रत्यक्षात तरुणींना ४०० ते ५०० रुपये मिळत होते. आंबटशौकीन ग्राहकांकडून ४ ते ५ हजार रुपये उकळणारी मनिषा ही तरुणींना कमी पैसे देऊन त्यांचे आर्थिक शोषण करीत होती. मात्र, गरीबीमुळे तरुणी देहव्यापारासाठी तयार झाल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.