नागपूर : शहरात देहव्यापाराचे अड्डे पुन्हा सुरु झाले असून आता तर काश्मीर, गुजरात, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, केरळ, पंजाब, दिल्ली आणि छत्तीसगड या राज्यातील मॉडेल नागपुरात देहव्यापार करण्यासाठी येत आहेत. आंबटशौकिनांच्या मागणींवरुन शहरातील मोठमोठ्या हॉटेलमध्ये मॉडेल तरुणींना विमानाने आणले जात आहे. सदरमधील एका ओयो हॉटेलमध्ये दिल्ली-पंजाब आणि छत्तीसगढ राज्यातील चार मॉडेल तरुणींकडून देहव्यापार सुरू होता. गुन्हे शाखेच्या एसएसबी पथकाने छापा घालून चारही तरुणींना देहव्यापार करताना ताब्यात घेतले. या प्रकरणी हॉटेलमालक, व्यवस्थापक आणि दलालांवर गुन्हे दाखल करण्यात आले. चेतन विजय चकोले (२४, नागपूर) आणि युगांत दिनेश दुर्गे (१९, चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. दोन दलालांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक कविता इसारकर यांचे पथक गस्तीवर होते. मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सदर पोलीस ठाणे हद्दीतील अचरज टॉवर, छावणी येथील ओयो हॉटेलमधील रूम नंबर २ मध्ये छापा टाकला. येथे चेतन चकोले आणि युगांत दुर्गे, राहुल अंकुश घाटोळे आणि दीपक नावाची व्यक्ती चार तरुणींकडून देहव्यावसाय करवून घेत होते. या छाप्यात चारही तरुणी ग्राहकांसोबत ‘नको त्या अवस्थेत’ सापडल्या. तरुणींना ताब्यात घेऊन त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून २ भ्रमणध्वनी, हुक्का पॉट व इतर साहित्य असा ८६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींविरूद्ध कलम १४३(३) भान्यासं, सहकलम ४, ५, ७ अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधीनियम, सहकलम ४(१), ५(१), २१ कोटपा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींना जप्त मुद्देमालासह सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हुक्क्याच्या धुरात हरवले हॉटेल
सदरमधील हॅपी स्प्रिंग ओयो हॉटेलमध्ये आंबटशौकिन ग्राहकांना तरुणींसह हुक्कासुद्धा पुरविण्यात येत होता. चारही तरुणींसुद्धा हुक्क्याच्या शौकिन आहेत. हॉटेल मालक चेतन चकोले हा हुक्का सुद्धा उपलब्ध करुन देत होता. पोलिसांनी हुक्का पॉट आणि तंबाखुसुद्धा जप्त केला.
विदेशात जाण्यासाठी देहव्यापार
दिल्लीतील एका तरुणीला विदेशात जायचे असून त्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी ती देहव्यापारात आली. ती बीएस्सी पदवीधर असून तिला कॅनडाला जायचे आहे. पंजाबच्या तरुणीला दारु, पार्ट्या आणि महागड्या कपड्याचा शौक आहे. छत्तीसगडची मुलगी झटपट पैसा कमविण्यासाठी मैत्रिणीच्या सांगण्यावरुन देहव्यापारात आली. चौथी तरुणी मॉडेलिंग करते.