सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; तीन मुलींची सुटका

शहरातील अनेक भागांमध्ये देहव्यापार मोठय़ा प्रमाणात सुरू असून त्यातून मॉलही सुटले नाहीत. शुक्रवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एम्प्रेस मॉलमधील एका सलून व स्पा मध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर छापा टाकून तीन मुलींची सुटका केली, तर दलाल महिलेला अटक केली.

दर्शनी ऊर्फ खुशी अनिल ढकान (३५) रा. काचीमेट, वाडी असे आरोपी महिलेचे नाव आहे. दर्शनी हिचे शुक्रवारी तलाव परिसरातील एम्प्रेल मॉलच्या पहिल्या मजल्यावर ‘एन सलून अ‍ॅण्ड ब्युटी’  केंद्र आहे. या ठिकाणी अनेकजण कामाला आहेत. पीडित तीन तरुणींना काम देण्याच्या उद्देशाने ती त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवनी थोरात, दामोधर राजुरकर, शीतलाप्रसाद मिश्रा, संजय पांडे, मनोजसिंग चौहान, प्रफुल बोंद्रे, प्रल्हाद डोळे, सुरेखा सांडेकर, छायात राऊत, साधना चव्हाण, अनिल दुबे, सामाजिक कार्यकर्त्यां पूनम रेवतकर, विजयराणी रेड्डी यांच्यासह सापळा रचला. त्यावेळी आरोपी महिलेने बनावट ग्राहकाकडून पैसे घेऊन एका मुलीसोबत आतमधील खोलीमध्ये पाठवले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून पीडित तरुणींची सुटका केली.

आता जाग आली

गेल्या काही दिवसांपासून परिमंडळ-२ चे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी रामदासपेठ परिसरातील अजय लोहारकर स्पा वर कारवाई करून देहव्यापार  उघडकीस आणला होता. त्यानंतर वर्धा मार्गावरील केपी इनमध्येही त्यांनी कारवाई केली. परिमंडळ-५ चे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात कळमना पोलीस ठाण्यांतर्गत अशीच कारवाई करण्यात आली. त्यामुळे सामाजिक सुरक्षा विभागाचे देहव्यापाराला संरक्षण असल्याची टीका होऊ लागली. त्यानंतर आज शुक्रवारी विभागाने ही कारवाई केली. यानंतर त्यांच्याकडून किती दलांवर कारवाई होणार,याकडे लक्ष लागले आहे.

मॉलमध्ये महिला असुरक्षित

काही दिवसांपूर्वी सीताबर्डीतील प्रचंड गर्दीचे मॉल म्हणून ओळख असलेल्या इटर्निटीच्या बिग बाजार फॅशनमध्ये एका कर्मचाऱ्याने थायलंडच्या तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता. ती घटना ताजी असतानाच एम्प्रेस मॉलमधील सलूनमध्ये सुरू असलेला देहव्यापाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मॉलमधील सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे.