अनिल कांबळे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : शहरात ‘डेटिंग ॲप’च्या नावावर हायप्रोफाईल देहव्यापाराचा नवा ‘ट्रेंड’ सुरू झाला असून यामध्ये हिंदी-भोजपुरी चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिराती आणि मॉडेलिंग क्षेत्रातील तरुणींसह उच्चशिक्षित तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ‘डेटिंग ॲप’द्वारे श्रीमंत घरातील मुलांसोबत मोठमोठ्या हॉटेलमध्ये ‘डेटिंग’च्या नावावर हा देहव्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात नवी दिल्ली, मुंबई, पंजाब, गोवा, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार येथील मॉडेलिंग करणाऱ्या आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या तरुणी मोठ्या प्रमाणात नागपुरात देहव्यापार करण्यासाठी येत आहेत. यामध्ये भोजपुरी चित्रपटात काम करणाऱ्या किंवा टीव्हीवर जाहिरातीत काम करणाऱ्या तरुणी सर्वाधिक आहेत.

आणखी वाचा-नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

मुंबई आणि दिल्ली येथील तरुणी दलालाच्या माध्यमातून महागड्या कारने नागपुरात येऊन पंचतारांकित हॉटेल्समध्ये थांबत आहेत. तसेच काही कंपन्यांच्या प्रॉडक्टसाठी फोटोशूट करणाऱ्या तरुणीसुद्धा ‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून नागपुरात येऊन थेट ‘हायप्रोफाईल’ देहव्यापार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील धरमपेठ, सीताबर्डी, माऊंट रोड, सदर, जनता चौक आणि विमानतळ परिसरातील भागात काही हॉटेलसमोर महागड्या कारमध्ये या तरुणी येतात. त्या तरुणींचे ‘प्रोफाईल्स ‘डेटिंग ॲप’वर असतात. श्रीमंत घरातील मुले त्यांना ‘डेटिंग’च्या नावावर देहव्यापारासाठी नेतात. अगदी तोकड्या कपड्यातील तरुणींसाठी हॉटेल संपूर्ण व्यवस्था केलेली असते. पोलिसांची कोणतीही भीती नसल्यामुळे हा देहव्यापार बिनधास्तपणे सुरू आहे.

आणखी वाचा-‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…

हॉटेलमालकांकडून ‘कमिशन’

‘डेटिंग ॲप’वर ओळख झाल्यानंतर तरुणी केवळ पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायला तयार होतात. हॉटेलमध्ये महागडा सूट आरक्षित करायला सांगतात. त्यानंतर महागडी दारूची ऑर्डर करायला भाग पाडतात. दीड ते दोन दिवसांत जवळपास दोन ते अडीच लाख रुपये खर्च करण्यास भाग पाडतात. कारण, हॉटेलमालकांशी तरुणींचे ३० ते ४० टक्के कमिशन ठरलेले असते. त्यामुळे महागडे जेवण आणि दारूची मागणी तरुणी करतात. तसेच पहिल्या भेटीतच महागड्या भेटवस्तूची मागणी करतात, अशी माहिती एका ‘डेटिंग ॲप’चा अनुभव आलेल्या युवकाने दिली.

भारतात मोठे जाळे

‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून रशिया, उझबेकिस्तान, बांगलादेश, थायलंड, स्वित्झर्लंड, श्रीलंका येथील तरुणींना देहव्यापाराशी जुळवणारी मोठी साखळी कार्यरत आहे. त्यासाठी भारतातही मोठे जाळे निर्माण करण्यात आले. एक ते दोन दिवसांत जवळपास १ ते ३ लाखांपर्यंत कमाई होत असल्यामुळे अनेक मॉडेल्स, तरुणी या व्यवसायात स्वतःहून जुळत असल्याची माहिती मिळाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prostitution of mumbai delhi girls through dating app including those working in films advertisements adk 83 mrj