नागपूर : राज्यातील सुमारे १८ हजार लहानमोठय़ा पाणथळ पक्षी अधिवासांना संरक्षित करण्याचे काम पक्षी सप्ताहाची संकल्पना वास्तवात उतरल्यानंतर होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मंडळाच्या एका सदस्याने पक्षी सप्ताहासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तो मंजूर केला. मात्र, गेल्या वर्षभरात त्याच्या संवर्धनाचा ‘अजेंडा’ ठरलेला नाही.

   राज्य वन्यजीव मंडळाचे तत्कालीन सदस्य यादव तरटे पाटील यांनी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी, त्यांची शिकार थांबवण्यासाठी आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण या मुख्य उद्देशासह पक्षी सप्ताह साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव सादर केला. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली (५ नोव्हेंबर) आणि दिवंगत पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली (१२ नोव्हेंबर) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर पक्षी सप्ताह जाहीर करण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर शासनाने परिपत्रक देखील काढले, पण पहिला साजरा झालेला सप्ताह कार्यक्रमांच्या पलीकडे गेला नाही.

   हा सप्ताह असला तरी वर्षभर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असताना ते कुठेही होताना दिसून येत नाहीत.  महाराष्ट्रात नांदूरमध्यमेश्वर आणि लोणार ही दोन रामसर स्थळे आहेत, पण त्यांच्याही संवर्धनासाठी पावले उचलली गेली नाहीत. औरंगाबाद येथील जायकवाडी पक्षी अभयारण्य आणि जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण रामसर दर्जा मिळवण्यास पात्र असताना व तशी मागणी झाली असताना त्यांनाही तो दर्जा अजूनपर्यंत मिळाला नाही.

   हे पक्ष्यांचे महत्त्वाचे अधिवास आहेत आणि जे जपले तरच संवर्धन होईल. पक्षीमित्र केवळ पक्ष्यांचे निरीक्षण, पक्ष्यांची यादी आणि छायाचित्रण यातच अडकून आहेत. महाराष्ट्र पक्षीमित्र देखील संमेलनाव्यतिरिक्त पक्ष्यांची शिकार रोखण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांचा अधिवास जपण्यासाठी काहीही करताना दिसून येत नाहीत.

राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला होता. शासनाने प्रस्तावाला मान्यता दिली याचा आनंद आहे, पण पुढे काय हा प्रश्न कायम आहे. पक्ष्यांच्या पाणथळ जागा, ज्या वनजमिनीवर, महसुली जमिनीवर आहेत, त्याचे दस्तऐवजीकरण होणे आवश्यक आहे. पक्ष्यांचे नामशेष होणाऱ्या अधिवासांचे संरक्षण आवश्यक आहे. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली व दिवंगत पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या शास्त्रोक्त अभ्यासाचा आधार त्यासाठी उपयुक्त ठरेल. केवळ संमेलने घेऊन काहीच होणार नाही, तर वर्षभर प्रत्यक्ष कृती हवी आहे.

– यादव तरटे पाटील, आजीवन सदस्य, महाराष्ट्र पक्षीमित्र

Story img Loader