गोंदिया : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत पुण्यातील भाजपाच्या सभेत अभद्र टिपणी केली. “उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहे,” असे अभद्र वक्तव्य अमित शाह यांनी केले. यामुळे शिवसेना (उबाठा) कार्यकर्ते चांगलेच संतापले. अमित शाह यांच्या विरोधात आज सोमवार २२ जुलै रोजी गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. गृहमंत्री शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांनी माफी मागावी, अशीही मागणी गोंदिया जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी केली.
आंदोलनात शिवसेना गोंदिया जिल्हाप्रमुख पंकज एस. यादव, शहर प्रमुख राजेश कनौजिया, अशोक आरखेल, तालुका समन्वयक संजू शमशेरे, विधानसभा समन्वयक सुनील रोकड़े, युवासेना जिल्हा अधिकारी हरिश तुलसकर, उपजिल्हा अधिकारी विक्की बोमचर, युवासेना शहर अधिकारी राहुल ठाकुर, उपतालुका प्रमुख गंगाधर शुलाखे, आदी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सहभागी झाले होते.
हेही वाचा >>>मोठी बातमी- आतड्याचा कर्करोगावर प्रभावी औषधाचा शोध…२१ दिवस उंदरावर…
इटियाडोह धरण, नवेगावबांध धरण ‘ओव्हरप्लो’ होण्याचे मार्गावर
गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अर्जुनी मोरगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तलाव-बोड्या तुडुंब भरल्या आहेत. तालुक्याचे भूषण असलेले इटियाडोह धरण व नवेगावबांध जलाशयात पाण्याचा साठा वाढत असल्याने लवकरच ही दोन्ही जलाशये ‘ओव्हरफ्लो’ होण्याचे मार्गावर आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटियाडोह धरण आज २२ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ७८.४२ टक्के भरलेला होता. दरतासांनी पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. इटियाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी वाढत आहे. यामुळे लवकरच धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवागमन करणाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अर्जुनी मोरगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नवेगावबांध जलाशयातील पाण्याची पातळी वाढत असल्याने हा जलाशयही ओव्हरफ्लो होण्याचे मार्गावर आहे. यामुळे या जलाशयाजवळ राहणाऱ्या व या जलाशयात मासेमारी करणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.