वर्धा : काँग्रेसच्या जिल्हा मुख्यालयी सद्भावना भवन येथे पत्रकार परिषद घेण्याचा सोपस्कार दुपारी आटोपला. मात्र, याचवेळी पत्रकारांना आमदार रणजीत कांबळे यांच्या तऱ्हेवाईक स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
एका ज्येष्ठ पत्रकारास काँग्रेसच्या सद्भावना भवनातील सज्जावर पडून असलेले महापुरुषांचे फोटो दिसून आले. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, सरदार पटेल, मौलाना आझाद व अन्य राष्ट्रीय नेत्यांचे फोटो धूळखात पडून असल्याने पत्रकाराने विचारणा केली. ही एकप्रकारे महापुरुषांची अवहेलनाच नव्हे काय, अशी विचारणा केली. तसेच ते व्यवस्थित लावले पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यावर आमदार कांबळे चिडून म्हणाले की, हे काय प्रश्न विचारणे झाले काय? यासाठी पत्रकार परिषद असते का? तुम्ही तुमच्या कार्यालयातील फोटो तेवढे बघा. भलते सलते प्रश्न सोडा.
हेही वाचा – अकोला : खोदकाम करताना आढळल्या तीन प्राचीन मूर्ती
हेही वाचा – नागपूर : आमदार मिर्झांभोवतालचे संशयाचे ढग गडद; ‘आरटीओ’ लाच प्रकरणात धक्कादायक तपशील उघड
आमदाराच्या बोलण्यातील ही आगळीक पत्रकारांना आश्चर्यात टाकणारी ठरली. श्रमिक पत्रकार संघाने कांबळे यांचा हा ‘आगाऊपणा’ क्षम्य नसल्याचे स्पष्ट करीत जाहीर निषेध व्यक्त केला.