चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड व एम्टाद्वारा संचालित बरांज खुली कोळसा खाण येथील प्रकल्पग्रस्त (मृत) कामगारांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर स्थायी नोकरी व नियमानुसार मिळणारे अर्थसहाय्यासाठी कंपनी प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्याकडे वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र असे करूनही न्याय न मिळाल्याने आज २५ फेब्रुवारीला सकाळपासून मृतांच्या पत्नी व नातेवाईकांनी खाणीच्या खड्ड्यात जलसमाधी आंदोलन केले.
कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने बरांज खुल्या कोळसा खाणीत शेकडो प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले. यातील काही कामगारांचा विविध कारणाने मृत्यू झाला. कंपनी प्रशासनाने मृतकांच्या कुटुंबातील वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे मान्य केले. पण, नोकरी दिली नाही. त्यामुळे आज २५ फेब्रुवारीला सकाळपासून मृत कामगारांच्या विधवांनी खाणीतील पाण्यात जलसमाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनात बेबी उईके,अर्चना फटाले, जया कोरडे, रंजना बाळपणे यांच्यासह अन्य महिलांचा समावेश होता.
हेही वाचा – होय, आम्ही समलिंगी आहोत! चंद्रपूर शहरात भव्य मिरवणूक
हेही वाचा – बारावीच्या परीक्षेचा निकाल लांबणार?
शेवटी कंपनी प्रशासनाने पोलिसांना पाचारण करून आंदोलकांना खाणीबाहेर काढून कार्यालयात नेले. तेथेही अनुकंपाधारकांच्या समस्या मार्गी न लागल्याने परत त्याच ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतले. याबाबत माहितीसाठी कंपनीच्या क्षेत्रीय प्रबंधकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.