एका जिल्ह्यातील उमेदवाराला कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी आधी अर्ज करता येत होता. परंतु, गृहमंत्रालयाने आता एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करण्याची अट ठेवली आहे. त्यामुळे हजारो उमेदवारांची पोलीस विभागात भरती होण्याचे स्वप्न भंगणार आहे. त्यामुळे ही जाचक अट रद्द करण्याच्या मागणीसाठी आज रविवारी सकाळी अकरा वाजता संविधान चौकात शेकडो युवक-युवतींनी आंदोलन केले.

हेही वाचा- ‘पोलीस भरतीतील जाचक अट रद्द करा’; गोपीचंद पडळकरांची फडणवीस यांच्याकडे मागणी

एका जिल्ह्यातील उमेदवार हा केवळ एकाच जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी अर्ज करू शकतो, अशी जाचक अट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या अटीमुळे राज्यातील हजारो पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे उमेदवाराला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी एकाचवेळी अर्ज करता यायला हवा. या मागणीसाठी आज संविधान चौकात शेकडो युवक-युवतींनी आंदोलन केले. उमेदवारांनी आज राज्य शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत त्वरित शुद्धीपत्रक काढून ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी केली.

हेही वाचा- नागपूर : ‘समृध्दी महामार्गाचे उद्घाटन जानेवारीत’; फडणवीस यांचे सूतोवाच

नागपूर जिल्हा आणि शहरातील विविध भागातून युवक संविधान चौकात जमले होते. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधी निदर्शने केली. राज्यात पोलीस विभागात १८००० पोलीस जागा भरण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीसाठी युवक-युवती तयारी करीत होते. ज्या जिल्ह्यात जास्त जागा असतील त्या जिल्ह्यात अर्ज भरता येत होता. परंतु, आता पोर्टलवर एकच अर्ज केल्यानंतर दुसरा अर्ज भरता येत नाही. त्यामुळे उमेदवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील कार्यालयात निवेदन दिले आहे.

Story img Loader