बुलढाणा : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी करणारा महानिषेध मोर्चा आज सिंदखेडराजा येथे काढण्यात आला. या महामोर्चात हजारो सिंदखेडराजावासी नागरिकांसह दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यही सहभागी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थान असलेल्या लखुजी राजे जाधव राजवाडापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. ऐतिहासिक सिंदखेडराजा नगरीतील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत हा मोर्चा निघाला. सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी, मुलगा विराज, त्यांच्या भगिनी कल्पना चौधरी यांच्यासह माजी आमदारद्वय डॉ. राजेंद्र शिंगणे, डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>एसटी महामंडळाच्या पाच हजार बसेस भंगारात

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपीना तात्काळ अटक करून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या निषेध मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव, युवक, युवती मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन धडकला. नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

राजमाता माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या लखुजी राजे जाधव राजवाड्या समोर निषेध सभा पार पडली. सभेत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवले त्या राजमाता जिजाऊ स्वतः लढल्या, तीच स्फूर्ती घेण्यासाठी मातृतीर्थामध्ये उपस्थित राहिले आहे. जिजाऊंनी शिवाजी महाराज यांना घडविले आणि संस्कार दिले तेच संस्कार आपण जपत आलो आहे. त्याच संस्कारामुळे हा लढा इथपर्यंत आपण आणलेला आहे. आपल्या सर्वांचे साथ असल्यामुळेच हा लढा उभा राहिला आहे. आपल्याला अन्यायाकडून न्यायाकडे जायचे आहे आणि जे माझ्या वडिलांसोबत घडले आहे ते सर्वांना माहित आहे. अशा मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे आवश्यक आहे. मला प्रत्येक क्षणाला वडिलांची आठवण येते. आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतो, सर्वांची एकच इच्छा आहे, सर्वांना न्याय हवा आहे. सर्वांची जी साथ मिळते आहे ती पुढेही कायम राहावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्यावा, असे भावनिक आवाहन माँ जिजाऊ च्या जन्मस्थळावरून वैभवी हिने केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest demanding arrest and action against the accused in the somnath suryavanshi murder case in parbhani scm 61 amy