अमरावती : लैंगिक शोषणाच्‍या विरोधात काही दिवसांपासून कुस्‍तीपटूंचे दिल्‍लीतील जंतर-मंतर मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असतानाच कुस्तीपटूंच्‍या समर्थनार्थ अमरावतीत इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्याजवळ मंगळवारी धरणे आंदोलन करण्‍यात आले.

या आंदोलनात सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक, शैक्षणिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अनेक पदके पटकावून आपल्या देशाची शान उंचावणारे कुस्तीपटू आंदोलन करीत आहेत. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण व अत्याचार करणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाच्‍या अध्यक्षांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कुस्तीपटूंचे हे आंदोलन सुरू आहे. महिला कुस्तीपटूंवरील अन्याय, अत्याचार भारतीय संविधानाने त्यांना दिलेल्या प्रतिष्ठेने जगण्याच्या हक्काची पायमल्ली तर आहेच, पण आपल्या भारतीय संस्कृतीवर कलंकसुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून भारताचे भूषण ठरलेल्या महिला खेळाडूंवर झालेले अत्याचार ही बाब अतिशय गंभीर, संतापजनक आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित खेळाडूंना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की निषेधार्ह अशीच आहे. अन्याय-अत्याचाराविरोधात लढा देत असलेल्या महिला कुस्तीपटूंसोबत उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असे प्रा. अंबादास मोहिते यांनी सांगितले.

हेही वाचा – वर्धा: अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांचा तिसरा डोळा, ‘अँटी गँग’ शाखा कार्यरत

धरणे आंदोलनात प्रा. अंबादास मोहिते, माजी महापौर विलास इंगोले, कॉंग्रेसचे शहराध्‍यक्ष बबलू शेखावत, माजी नगरसेवक दिनेश बुब, प्रदीप बाजड, रामेश्‍वर अभ्‍यंकर, डॉ. गोविंद कासट आदी सहभागी झाले होते.

Story img Loader