स्वतंत्र विदर्भ द्या, अन्यथा राजीनामा द्या… अशी मागणी करत विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार कृपाल तुमाने यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शने केली.गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत असताना केंद्र व राज्य सरकारमधील नेते या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. विदर्भातील खासदारांनी निवडणुकीत वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडून आल्यावर त्यांना याचा विसर पडला, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भातील सर्वच खासदारांच्या निवासस्थान व जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शने केली. नागपुरात खामल्यातील नागपूर सुधार प्रन्यासच्या उद्यानापासून विदर्भ राज्य आंदोलनाचे अध्यक्ष अरुण केदार यांच्या नेतृत्वाखाली गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धडक देण्यासाठी मोर्चा निघाला.
परंतु, पोलिसांनी आंदोलकांना खामला चौकात अडवले. मात्र पोलिसांचे कठडे तोडून कार्यकर्ते समोर निघाले आणि गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील पायऱ्यावर जाऊन काही वेळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर शिष्टमंडळाने गडकरी यांचे स्वीय सचिव अतुल मंडलेकर यांना निवेदन दिले. त्यानंतर भांडे प्लॉट येथून खासदार कृपाल तुमाने यांच्या जनसंपर्क कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी तुमाने यांचे स्वीय सहायक अमित कातुरे यांना निवेदन सोपवण्यात आले. मुकेश मासुरकर, विष्णू आष्टीकर, प्रभाकर कोंडबत्तुनवार, सुनीता येरणे, तात्यासाहेब मते, अनिल बोबडे, अशोक पाटील, रेखा निमजे, प्रदीप उबाळे आदी विदर्भवादी नेते व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
हेही वाचा : वर्धा: पत्रकारांचा बहिष्कार, तरीही चित्रा वाघ आपल्या भूमिकेवर ठाम
पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थासमोर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यानंतरही विदर्भ राज्य आंदोलन समितीने मोर्चा काढला. पोलिसांनी कठडे लावत खामला चौकात आंदोलनकर्त्यांना अडवले मात्र त्या ठिकाणी कठडे तोडून आंदोलक समोर निघाले आणि गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयापर्यंत पोहचले. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे