अमरावती : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्‍या आरक्षणासंदर्भात केलेल्‍या वक्‍तव्यावरून भाजपतर्फे ठिकठिकाणी आंदोलन केले जात असताना आता वंचित बहुजन आघाडीने राहुल गांधी यांच्‍या विरोधात मोहीम उघडली आहे.

राहुल गांधी यांच्‍या वक्‍तव्‍याचा निषेध करण्‍यासाठी वंचित बहुजन आघाडीच्‍या वतीने काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्‍या दर्यापूर येथील निवासस्‍थानासमोर शुक्रवारी आंदोलन करण्‍यात आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्‍यात आली. बळवंत वानखडे यांच्‍या समर्थकांनीही प्रत्‍युत्‍तर देत घोषणा दिल्‍या.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांच्‍या अंगावर धावून गेले, पण पोलिसांनी वेळीच उभय पक्षांच्‍या कार्यकर्त्यांना रोखले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्‍यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्‍या नेतृत्‍वात खासदार बळवंत वानखडे यांच्‍या दर्यापूर येथ्‍रील निवासस्‍थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून निषेध मोर्चा काढण्‍यात आला.

हेही वाचा >>>नागपूर जिल्ह्यात या महाविद्यालयात चाणक्य कौशल्य विकास केंद्र

मोर्चा घरासमोर पोहचल्‍यानंतर धैर्यवर्धन पुंडकर यांचे भाषण सुरू झाले, त्‍यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्‍याचे पहायला मिळले. पुंडकर यांनी बळवंत वानखडे यांच्‍याविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याचा आरोप काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीच्‍या कार्यकर्त्‍यांनी निषेधाच्‍या घोषणा दिल्‍या. प्रत्‍युत्‍तरादाखल काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनीही घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आव्‍हान, प्रतिआव्‍हान देण्‍यात आले आणि कार्यकर्त्‍यांमध्‍ये चांगलीच बाचाबाची झाली. काही कार्यकर्ते एकमेकांच्‍या अंगावर धावून गेल्‍याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्‍तक्षेप करून कार्यकर्त्‍यांना रोखले.

हेही वाचा >>>कामठी रेल्वे स्थानकाबाहेर हावडा एक्सप्रेसवर दगडफेक

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा आम्‍ही आदर करतो, पण त्‍यांचे कार्यकर्ते हे भाजपला मदत करीत आहेत, असा आरोप यावेळी काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे भाजपचे चमचे आहेत, अशा घोषणा काँग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी दिल्‍या. त्‍यावर वंचित बहुजन आघाडीच्‍या कार्यकर्त्‍यांनीही जोरदार घोषणाबाजी केली.

भाजप पुरस्कृत आंदोलन – काँग्रेस

काही दिवसांपूर्वी भाजपनेही राहुल गांधींविरोधात आंदोलन छेडले होते. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने सुरू केलेल्‍या या आंदोलनाला काँग्रेसने भाजप पुरस्कृत आंदोलन म्हटले आहे. देशात बहुसंख्य वर्ग एससी-एसटी-ओबीसी असूनही निर्णयप्रक्रियेत त्यांची संख्या कमी आहे. जेव्हा हे चित्र सुधारेल ही असमानता दूर होईल, तेव्हा आरक्षण थांबवण्याचा विचार होईल, असे वक्‍तव्‍य राहुल गांधी केले होते. या वक्‍तव्‍यावरून वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्‍या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे.