नागपूर : बलात्काराच्या घटना या अमानुष असून यातून विकृत मानसिकतेचे दर्शन होते. भंडाऱ्यातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या महिलांनी केली आहे.

बलात्काराच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी. नागपूरच्या मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, भंडाऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडून घटनेची  घेतली आहे. पीडितेला समुपदेशन तसेच मनोधैर्य योजनेतून पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

– डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

ही अत्याचाराची घटना अतिशय वाईट आहे. शनिवारी भंडाऱ्यात जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. पोलिसांनी कशी चौकशी केली याबाबत माहिती घेणार आहे.

चित्रा वाघ, भाजप नेत्या

अत्याचाराची घटना निंदनीय आहे. विकृत पुरुषी मानसिकता यातून दिसून येते. अजूनही महिला सुरक्षित नाही. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी.

– आभा पांडे, सदस्या, राज्य महिला आयोग

 महिलांना आजही सुरक्षा नाही. बलात्कार करणाऱ्या  नराधमाच्या विरोधात महिलांनी एकजूट होऊन संघर्ष केला पाहिजे. या घटनेचा पाठपुरावा करून दोषींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.

– शिल्पा बोडखे, शहर महिला आघाडी संपर्क प्रमुख, शिवसेना

 दिल्लीच्या निर्भया प्रकरणासारखी ही घटना आहे. हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवावे. आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे. संबंधित महिला मानसिकदृष्टय़ा खचली आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन तिचे समुपदेशन करणे आवश्यक आहे.

– नूतन रेवतकर, शहर अध्यक्षा, नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस</p>

 समाजाची प्रगती होत आहे. पायाभूत सुविधा विकसित होत आहेत; परंतु पुरुषांची मानसिकता बदललेली नाही. ते समाजाचे ठेकेदार बनून फिरतात. त्यांनी आधी मानसिकता बदलावी. केवळ  भारतमाता की जय म्हणून चालणार नाही. महिलेच्या सन्मानाशिवाय  घोषणा व्यर्थ आहेत.

 – नॅश अली, अध्यक्ष, नागपूर शहर महिला काँग्रेस

  समाजाचे नियंत्रण सुटले का, या प्रश्नासह अनेक  प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत. सरकारने अशा घटना गंभीरपणे घेऊन शिक्षेमध्ये कठोर तरतूद करावी. दोषी व्यक्तींमध्ये भीती निर्माण झाली पाहिजे.

 – अरुणा सबाने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां

Story img Loader