लोकसत्ता टीम

यवतमाळ : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवून हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवसेना (शिंदे) जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड यांच्या नेतृत्वात स्थानिक माईंदे चौकात बुधवारी हे आंदोलन करण्यात आले.

मंगळवारच्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पहलगाम येथील बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक त्या भागात अडकून पडले आहेत. यवतमाळ येथे शिवसेनेने या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत, हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दिले. केंद्र सरकारने दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवसेना (उबाठा) कडून निषेध

जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. शिवसेना (उबाठा) कडूनही निदर्शने करून या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. खासदार संजय देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, प्रवीण पांडे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक दत्त चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या बोटचेपी धोरणाचा निषेधही शिवसेना (उबाठा) च्या पदाधिकाऱ्यांनी केला. केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी आणि जम्मू काश्मीरकडे करण्यात आलेले दुर्लक्ष यामुळे निष्पाप पर्यटक, अधिकाऱ्यांचा बळी गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शिवसेनेच्या या निषेध आंदोलनांमध्ये नागरिकांनीही सहभागी होत या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविला.

प्रशासनाने पर्यटकांची माहिती मागवली

जम्मू कश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला असून काही पर्यटक जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिक पहलगाम येथे अडकले असल्यास त्याची माहिती जिल्हा प्रशासनास देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे. मदतीसाठी जम्मू काश्मीर शासनाच्या वतीने हेल्पलाईन सुरु करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षात तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नागरिकांनी कोणी नातेवाईक, मित्र जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्यास माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.