अकोला: शहरातील अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्यात क्षतिग्रस्त झाला. आता गेल्या सात महिन्यांपासून त्याच्या दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. या क्षतिग्रस्त पुलाची ग्रीन ब्रिगेडच्यावतीने रविवारी महाआरती करून प्रतीकात्मक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याला प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पुलाच्या दीर्घायुष्यासाठी ग्रीन ब्रिगेडच्यावतीने साकडे घालण्यात आले.
शहरातील मध्यवर्ती भागात १६३ कोटींच्या खर्चातून तीन वर्षांत दोन उड्डाणपूल उभारण्यात आले. त्यावरून २८ मे २०२२ पासून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्यात आले होते. अशोक वाटिका चौक, अमरावती मार्ग व टॉवर चौकात पुलावरून ‘रॅम्प’ मार्ग ठेवण्यात आला, तर बसस्थानक चौकात भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा… व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाले, घाबरू नका; रिकवरीसाठी ‘हे’ उपाय करा
अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूलाचा अमरावतीकडे जाणारा मार्ग अवघ्या सहा महिन्याच्या आता १९ डिसेंबर २०२२ रोजी खचला. या मार्गाखालून गेलेली ६०० मिली मिटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या मार्गाखालील राखेचा भराव बाहेर येऊन वाहून गेला. परिणामी, हा मार्ग बंद करावा लागला. गेल्या सात महिन्यांपासून या पुलाचे दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. अद्यापही हे कार्य पूर्ण झाले नसल्याने पुलावरून अमरावतीकडे जाणारी वाहतूक बंद आहे. वाहनधारकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा… अकोला जिल्ह्यात ४७ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, ३१३ घरांची पडझड
खचलेल्या उड्डाणपूल प्रकरणांत ग्रीन ब्रिगेडचे विवेक पारसकर यांनी टीका केली. बिनकामाच्या उड्डाणपुलाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी २३ जुलैला ग्रीन ब्रिगेडच्यावतीने उड्डाणपुलाची महाआरती करण्याचे नियोजित होते. मात्र, प्रशासनाने याला परवानगी नाकारली. त्यामुळे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीनंतर परत तडे जाऊ नयेत, पाडलेला पूल लवकर पूर्ण व्हावा, तसेच उड्डाणपुलाच्या दीर्घायुष्य लाभावे, यासाठी श्री राजराजेश्वराला साकडे घालण्यात आले. यावेळी ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष विवेक पारसकर, विलास गोतमारे, रितेश दुबे, अनुन दुबे, सचिन शेळके, भूषण सावरकर, अनिल माहोरे, ललित माळी, अमित भिरड आदींसह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.