यवतमाळ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बँका आणि महिलांमध्ये वारंवार संघर्षाची परिस्थिती उद्भवत आहे. बहुतांश महिलांनी बँकेत खाते काढल्यानंतर केवायसी न केल्याने अर्ज करूनही असंख्य महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. सोमवारी घाटंजी येथील महाराष्ट्र बँकेसमोर महिलांनी आंदोलन करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याची मागणी केली. बँकेने तत्काळ केवायसी पूर्ण नाही केली तर बँकेत शिरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.
राज्य सरकारने महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा दीड हजार रूपये मानधन सुरू केले. घाटंजी येथील महाराष्ट्र बॅंकेने महिला खातेदारांची केवायसी पूर्ण न केल्याने असंख्य महिलांना अद्याप या योजनेला लाभ मिळाला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे. या संदर्भात वारंवार निवेदन देवूनही बँकेकडून पूर्तता न झाल्याने घाटंजी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्या नेतृत्वात महिलांनी आज महाराष्ट्र बँकेसमोर धरणे आंदोलन केले. केवायसीसह इतर नियम समोर करून महिलांना या योजनेपासून वंचित ठेवले जात असल्यावा आरोप यावेळी महिलांनी केला.
हेही वाचा >>>ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…
लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बँक खात्यात त्वरीत जमा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. या योजनेसाठी शासनाने अनेक अटी शिथिल केल्या. असे असतांनाही घाटंजी येथील महाराष्ट्र बॅंकेचे व्यवस्थापक महिलांना असभ्य आणि अपमानजनक वागणूक देत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला. अनेक महिलांनी सूचना मिळताच केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे बँकेकडे जमा केल्यानंतरसुध्दा मागील एक महिन्यापासून बँकेने बऱ्याच महिलांच्या केवायसी प्रलंबित ठेवल्याचा आरोप शैलेश ठाकूर यांनी केला आहे. या महिलांची यादी आता बॅंकेकडे सुपूर्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. केवायसी किंवा अन्य कारणांमुळे तात्पूरते बंद पडलेले बँक खाते पुन्हा सुरू करण्यात यावे आणि या योजनेचा लाभ महिलांना द्यावा, अशा मागणीचे निवदेन महिलांना आज बँकेच्या व्यवस्थापकांना दिले. महाराष्ट्र बॅंकेच्या वरिष्ठांनी घाटंजी शाखा व्यवस्थापकास समज द्यावी तसेच प्रलंबित केवायसीची कामे प्राधान्याने पूर्ण करावी. अन्यथा १० ऑक्टोबर रोजी बॅंकेत शिरून आंदोलन करण्याचा इशारा शैलेश ठाकूर यांनी दिला आहे. या आंदोलनात सैयद फिरोज, विक्की ठाकूर, पवन गोडे, विनोद महाजन, सुरेश जाधव, वसंता मोरे, कज्जुम कुरेशी, योगी सरवय्या, ओम नैनपार, सुभाष गटलेवार, दादा गिनगुले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.