बुलढाणा: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध आणि या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांच्यासह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी बुलढाणा येथे सर्वपक्षीयांचे वतीने निदर्शने करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना वरील मागणीचे निवेदन देण्यात आले.
स्थानिक संगम चौक येथे सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळा व स्मारकच्या प्रवेशद्वासमोर ही निदर्शने करण्यात आली. बुधवारी, पाच मार्चला संध्याकाळी उशिरा हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात सहभागी सर्वपक्षीय नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटल्याचे दिसून आले. नंतर जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवेदन देण्यात आले.
सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्ये प्रकरणातील मुख्य सूत्रधार व मारेकरी यांना तात्काळ फाशी देण्यात यावी, ही मुख्य मागणी रेटण्यात आली.या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा राजकीय वरदहस्ताखाली असल्याचे बोलले जाते. याबाबत प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्यामुळे जनमानसामध्ये मोठा रोष वाढला आहे. अद्याप काही मारेकरी मोकाट असल्याने सर्व जनतेमध्ये तीव्र असंतोष असून फरार असलेल्या आरोपीला तात्काळ अटक करावी अशी जनभावना आहे. मृतक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी शिवाय जनमानसामध्ये हे राज्य कायद्याचे आहे ही प्रतिमा कायम राहावी यासाठी सूत्रधार, आरोपी व त्याच्या आकाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने देशमुख परिवार उघड्यावर आला आहे. त्यामुळे शासनाने त्यांना भरीव आर्थिक मदत देऊन कुटुंबातील व्यक्तींना नोकरीची हमी द्यावी. तसेच परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू ही देखील बाब देखील पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे या घटनेची न्यायालयीन चौकशी करुन दोषींना कठोर शासन करण्यात यावे. अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची आगऱ्याहून झालेली सुटका ही औरंगजेबाला लाच देऊन झालेली आहे, अशी मुक्ताफळे उधळली व महाराजांच्या शौर्यावर शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रमाणे तथाकथित पत्रकार डॉ. प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज हे खैबर खिंडीतून पळून गेले असा उल्लेख करुन शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न व शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे मनमानी पद्धतीने, सवंग प्रसिद्धी साठी वाटेल तशी विधाने करून लाखो करोडो शिव प्रेमीच्या भावना या महाभागानी केली आहे.अशा प्रवृत्तीच्या लोकांवर देखील तात्काळ कठोर कारवाही करण्यात यावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.