यवतमाळ : पावसाळा सुरू झाला तरी जीवन प्राधिकरणच्या नियोजनशुन्य कारभारामुळे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. अमृत पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराला त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज सोमवारी येथील तहसील चौकाजवळ जीवन प्राधिकरणला श्रद्धांजली वाहून निषेध नोंदविला.
यवतमाळ शहरात पाईपलाईन फुटणे, लिकेजेस यातून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत जाते. दुसऱ्या बाजूला भर पावसाळ्यातसुद्धा अनेक भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पाईपलाईन दुरुस्त करण्याबाबत अनेक नागरिकांनी वारंवार निवेदने दिली, तरीसुद्धा ढीम्म् बसलेली जीवन प्राधिकरणाची यंत्रणा काहीही हालचाल करत नाही. या प्रकाराला कंटाळून पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आज तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या रेडक्रॉस भवनाजवळ फुटलेल्या पाईपलाईनचे ठिकाणी श्रद्धांजली सभा घेऊन नागरिकांच्या संतापाला वाट करून देत स्वाक्षरी मोहीम राबवली.
नागरिकांनी या आंदोलनाला जाहीर पाठींबा देऊन आपला निषेध स्वाक्षरी मोहिमेतून व्यक्त केला.
हेही वाचा >>>राष्ट्रवादीच्या नेत्यांना विधान परिषद आमदारकीचे वेध; गोंदिया-भंडारातील इच्छुक सक्रिय
हेही वाचा >>>तलाठी भरती: ४६४४ जागांसाठी तब्बल दहा लाखांवर अर्ज, “या” तारखेपर्यंत मुदतवाढ, तर या महिन्यात होणार परीक्षा
राहुल दाभाडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रा. घनश्याम दरणेदत्ता कुळकर्णी, प्रलय टीप्रमवार, किशोर बाभुळकर, संकेत लांबट, अनिकेत नवरे, रमिझ शेख, विजय बुंदेला, विवेक पाटील, विनोद दोंदल, दिनेश हरणे, गोपाल चव्हान, चेतन मोहुर्ले, तेजस चव्हाण यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.