नागपूर : शासनाने ४५ जमातींपैकी हलबा, माना, गोवारी, धनगर, धोबा, ठाकूर या आदिवासी जमातींसह ३३ जमाती क्षेत्रबंधनाबाहेर काढत त्यांच्यावर अन्याय केला आहे, असा आरोप करीत राष्ट्रीय आदिम कृती समितीने गोळीबार चौकात सरकारविरोधात निदर्शने केली.
आंदोलनाचे नेतृत्व विश्वनाथ आसई, दे. बा. नांदकर, ॲड. नंदा पराते, दीपराज पार्डीकर, प्रकाश निमजे, धनंजय धापोडकर, शिवानंद सहारकर, ओमप्रकाश पाठराबे यांनी केले. आंदोलक म्हणाले, तथाकथित आदिवासी आमदारांच्या दबावातून ३३ जमातीतील १ कोटी नागरिकांवर अन्याय होत आहे. महाराष्ट्रात अनुसूचित जमाती यादीतील ४५ जमातींपैकी सन १९७७ पूर्वीच्या क्षेत्रबंधनातील फक्त १२ जमातीच खरे आणि क्षेत्रबंधनाबाहेरील ३३ जमाती खोटे हा प्रकार संविधान विरोधी आहे. दरम्यान, आंदोलनामुळे जगनाथ बुधवारीसह अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली.