बुलढाणा : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद आज बुलढाण्यात उमटले! आज मंगळवारी, पंचवीस फेब्रुवारी रोजी शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात निदर्शने करुन गोऱ्हे यांचा निषेध करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी गोऱ्हे यांच्या  प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र रोष व्यकत केला. यावेळी बोलताना  शेळके यांनी नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे कुटुंबियांनी  केलेल्या उपकाराची परतफेड नीच वृत्तीने केल्याची जहाल टीका केली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना व त्यांना बदनाम करण्यासाठी निलम गोऱ्हे यांनी, ‘एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या’, असे आक्षेपार्ह विधान केले होते. या वक्तव्याचा जाहिर निषेध म्हणून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना महिला नेत्या ॲड.जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना जयश्री शेळके म्हणाल्या, १९९८ मध्ये नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांच्याकडे उपनेते पदाची जबाबदारी दिली. २००२ पासून आतापर्यंत ४ वेळा त्यांना विधान परिषदेवर निवडून येण्याची संधी दिली. तसेच पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्याच उपकारांवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून आजही त्या कार्यरत आहेत.

ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी नीलम गोऱ्हे यांना अनेक पदे दिली, मानसन्मान दिला, पक्षात आणि समाजात ओळख मिळवून दिली. त्या पक्षाप्रती आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची सोडून अशा प्रकारची वक्तव्य करुन त्यांनी निचपणाचा कळस गाठला आहे. गोऱ्हे यांनी पक्षप्रमुखांनी केलेल्या उपकारांची परतफेड त्यांच्या निचपणाने केली असे ॲड.जयश्री शेळके म्हणाल्या. या निचपणाचा जाहिर निषेध म्हणून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष महिला आघाडीच्या वतीने शिवसेना नेत्या ॲड.जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा समोर निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चंदा बढे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विजया खडसान, उपजिल्हाप्रमुख कल्पना बोधेकर, सहसंघटक आरती देशमुख, शहर प्रमुख लता शिंदे, अर्चना  शेळके, भावना पाटील, पुजा दाभाडे, रोहीणी राजपूत, वैशाली वाकोडे, गायत्री गायकवाड, स्वाती नवले, शुभांगी बाहेकर, मिना गव्हाणे, नंदा अंभोरे, रत्ना शेळके दिपाली जाधव, दिपाली राजपूत, स्मिता वराडे, सोनाली वाघ यांच्यासह अनेक महिला आंदोलनात सहभागी झाल्या .

ठाकरे यांच्या नावाने आजही गद्दारांना घाम फुटतो आंदोलनानंतर प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधीसोबत बोलतांना जयश्री शेळके यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर खरपूस टीका केली. त्या म्हणाल्या कि,शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षासोबत गद्दारी करुन तीन वर्षांपुर्वी काही गद्दार पक्षातून बाहेर पडले होते. त्यांनी पन्नास खोके घेऊन पक्षासोबत पर्यायाने सबंध महाराष्ट्रासोबत गद्दारी करत लाचारी पत्करली. सर्व गद्दार शिवसेनेतून बाहेर पडले त्याच वेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र, आजही महाराष्ट्रात ठाकरे नावाचा दरारा कायम आहे. ठाकरे यांच्या नावाने आजही गद्दारांना घाम फुटतो. त्यामुळेच एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या अशी आक्षेपार्ह विधाने करुन शिवसेना पक्षप्रमुखांना बदनाम करण्याचे वाद निर्माण करण्याचे काम निलम गोऱ्हे सारखे गद्दार करत आहेत. यामुळे अजूनही गद्दारांचा रोजगार ठाकरे या नावाशिवाय पुर्णच होत नाही, हे स्पष्ट  होते, असे शेळके म्हणाल्या.