बुलढाणा: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत अन्नत्याग आणि बुलढाण्यात आयोजित मराठा क्रांती मोर्चा यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातही पोलीस विभागाचा ताण वाढला आहे.
जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ ८ सप्टेंबर पासून मोताळा येथे सकल मराठा समाजबांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याला पाठींबा म्हणून तालुक्यातील समाज बांधव दररोज साखळी उपोषण करीत आहे. यामुळे मोताळा हे जिल्ह्यातील आंदोलनाचे एक केंद्र ठरले आहे. उपोषण स्थळी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी भेट देत आहे.
काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी भेट देऊन चर्चा केली. सहाही उपोषण कर्त्यांनी मागण्यांची पूर्तता होईपर्यंत अन्नत्याग वर ठाम असल्याचे यावेळी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी समाजबांधवांनी उपोषण सुरु केले आहे. समाज त्यांच्या योगदानाची नक्कीच जाणीव ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा… “जिल्हा परिषद शाळा उद्योजकांना विकण्याचा सरकारचा डाव!” शाळा बचाव समितीचा आरोप
दुसरीकडे येत्या १३ सप्टेंबर रोजी बुलढाण्यात आयोजित मोर्चाची सुसज्ज तयारी सुरू आहे. हा मोर्चा जंगी ठरणार असा दावा समन्वयक समितीच्या वतीने करण्यात येत आहे. सहा वर्षापूर्वी बुलढाण्यात काढण्यात आलेल्या मोर्च्याचा अनुभव असल्याने बुधवारचा मोर्चा अभूतपूर्व ठरणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन प्रामुख्याने पोलीस विभाग ‘अलर्ट मोड’ वर आला आहे. मोर्च्या साठी लागणारा बंदोबस्तचे नियोजन आत्ता पासूनच करण्यात आला आहे.