वर्धा : स्वतःचे एक छोटे का असेना घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. तीच तो आयुष्यभराची पुंजी समजतो. पण ते सुद्धा शक्य होत नसल्याने सरकार मग घरकुल योजना तयार करीत मदतीचा हात देते. पंतप्रधान राष्ट्रीय आवास योजना त्यासाठीच. पण सरकारी योजना म्हणून कसेबसे घरकुल गरिबांना बांधून न देता आकर्षक व सोयीचे घर देण्याचा विचार झाला.
हैद्राबाद येथे बैठक झाली. त्यात राष्ट्रीय बांधकाम अभियांत्रिकी केंद्र व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने घेतलेल्या या बैठकीत देशभरातील पर्यवरणपूरक बांधकाम करणाऱ्या संस्थांना निमंत्रित करण्यात आले. कोरोना काळात ही घडामोड घडली. त्यात वर्धा येथील पर्यावरण विकास केंद्रानेही हजेरी लावली आणि त्यांचेच मॉडेल पसंतीस उतरले. तत्कालीन केंद्रीय मंत्री गिरीराज किशोर यांनी पसंती दर्शवितांनाच गरिबांच्या घरात पण दोन बेडरूम देण्याची सूचना केली. त्यानुसार केंद्राचे डॉ. सोहन पंडया व त्यांची चमू कामास लागली.
आणखी वाचा-महिलेची मुला-मुलीसह आत्महत्या! काय घडले नेमके?
हे घरकुल अभिनव करण्याचा चंग बांधून नैसर्गिक साहित्याचा वापर झाला. लाल विटांचे कॉलम, दगडाचा पाया, छत हे कोणीकल टाईल्सचे, बांबूच्या भिंती असे बांधकाम झाले. भिंतीना मजबुती यावी म्हणून बांबूच्या कमच्यांना सिमेंटची छपाई झाली. कमीतकमी खर्चात बांधकाम करण्याचा मनसुबा साध्य झाला. शहरी भागात प्रती वर्गफूट ९८७ रुपये तर ग्रामीण भागात ७८३ रुपये दर पडणार. ४०९ वर्गफुटात दोन बेडरूम, एक बेडरूम अटॅच व एक स्वतंत्र स्वच्छतागृहे, बैठक, स्वयंपाकघर, पेसेज देण्यात आले आहे. बांधकाम पर्यावरणपूरक म्हणजे हे घर उन्हाळ्यात शीतल तर हिवाळ्यात गरम वातावरण राखणार. या मॉडेल घराचे उदघाटन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौव्हाण यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे.
वर्धेच्या संस्थेचा हा गौरव असल्याचे डॉ. सोहन पंड्या म्हणाले. याची किंमत चार लाख रुपये पडली असून काही शासन तर काही वाटा लाभार्थी उचलतील. देशभरात अशी लक्षावधी घरे बांधल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. पंडया हे गत अनेक वर्षांपासून ग्रामीण विज्ञान व ग्रामोद्योगी क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध गांधीवादी संस्थांच्या माध्यमातून ते महात्मा गांधी यांच्या विचारनुरूप ग्रामीण कार्यास मार्गदर्शन करीत असतात. आता केंद्र सरकारने त्यांच्या कृतीस पसंती देत त्यांच्या पर्यावरण पूरक कार्यास पावतीच दिल्याचे म्हटल्या जात आहे.