अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ मधील ‘लिपिक-टंकलेखक’ या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर गेल्या ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या गुणवत्ता यादीच्या आधारे २१ फेब्रुवारी आणि १ एप्रिलच्या प्रसिद्धीपत्रकान्वये उमेदवारांकडून नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम मागविण्यात आले होते. या संवर्गाच्या निकालाबाबत उमेदवारांकडून वारंवार विचारणा करण्यात येत असल्याने ‘एमपीएससी’ने स्पष्टीकरण जारी केले आहे.

प्रस्तूत संवर्गाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. विज्ञापित पदांची संख्या, आरक्षण, अर्हता इत्यादी बाबी विचारात घेऊन आणि पडताळणी करून प्रस्तूत संवर्गाची तात्पुरती निवड यादी पुढील आठवड्यापर्यंत प्रसिद्ध करून उमेदवारांकडून बाहेर पडण्याचा विकल्प (ऑप्ट आऊट) मागविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३- लिपिक टंकलेखन व कर सहायक संवर्गाच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यावेळी ‘एमपीएससी’च्या इतिहासातील सर्वात जास्त पदांच्या भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. या जाहिरातीतून ७ हजारांपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. या निकालावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे प्रकरण ‘मॅट’मध्ये गेले होते. अखेर ‘मॅट’च्या निकालानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

या पदांची भरतीप्रक्रिया कासवगतीने सुरू असल्याची टीका करण्यात आली होती. गेल्या अडीच वर्षांपासून या प्रक्रियेत अडकलेले लिपिक-टंकलेखक पदासाठी परीक्षा दिलेले सुमारे सात हजारांवर परीक्षार्थी त्यामुळे अस्वस्थ आहेत. या पदांसाठी गट-ब आणि क संयुक्त परीक्षा झाली. यातील कर सहाय्यक पदाच्या उमेदवारांचा निकाल लागला, त्यांना शिफारसपत्रेही मिळाली आहेत. लिपिक-टंकलेखक पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी मात्र अद्यापही जाहीर झालेली नाही.

आयोगाने जानेवारीस २०२३ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात लिपिक टंकलेखकाच्या ७ हजार ३४ आणि कर सहाय्यकाच्या ४६८ जागा होत्या. ११ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर १५ ते २० दिवसांत तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित असताना अद्यापही ती प्रसिद्ध झाली नाही, त्यामुळे ‘एमपीएससी’ कडे सातत्याने विचारणा केली जात आहे. आता त्यावर आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.