यवतमाळ :’ती’ स्वतःला पोलीस समजायची. यातूनच ती अकोला शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस वर्दीत वावरायची. इतकेच नव्हे तर आसपासच्या गावांमध्ये जाऊन गावकऱ्यांना रुबाब दाखवायची.पतीच्या निधनाने २१ व्या वर्षी तिला पहिला मानसिक झटका आला आणि त्यातूनच तिची पोलीस म्हणून भटकंती सुरू झाली. पण ती खरीखुरी पोलीस नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील निंबोरी येथील रहिवासी सीमा वानखडे (४०) या मनोरुग्ण महिलेला अडीच महिन्यांच्या मानसोपचाराने संतुलित आयुष्य लाभले आहे. सीमा मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे अकोल्याचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या लक्षात आले. त्यांच्या पुढाकारातून सीमाच्या १३ वर्षीय मुलीला अनाथ आश्रमात तर सीमाला २७ सप्टेंबरला यवतमाळ येथे नंददीप बेघर व मनोरुग्ण निवारा केंद्रात उपचारार्थ पाठविण्यात आले.

हेही वाचा…गोंदिया : गर्भवती महिला दगावल्याने आंदोलन, वैद्यकीय अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा…

स्वतःला पोलीस समजणाऱ्या मनोरुग्ण ‘सीमा’वर नंददीप येथे अडीच महिने मानसोपचार चालले. या ठिकाणी मेंदूरोगतज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम यांच्या मानसोपचाराने तिच्यात बरीच सुधारणा झाली. पती गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी सीमाला दूर सारल्याने ती तणावाखाली होती. परंतु, नंददीपने वेळीच आधार दिल्याने सीमाचे आयुष्य पूर्वपदावर आले आहे.

अकोल्याचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या सतर्कतेमुळे तिच्या आयुष्याने सकारात्मक वळण घेतले. बुधवारी ‘नंददीप’चे संचालक संदीप शिंदे यांच्या मातोश्री लता शिंदे यांच्या उपस्थितीत सीमाला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करून तिला ‘बिदाई’ देण्यात आली.
नगर परिषदेच्या दीनदयाळ बेघर निवारा केंद्र पुरस्कृत नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रातून मनोरुग्णांचे यशस्वी पुनर्वसन केले जाते. सीमाच्या बिदाई प्रसंगी मानसशास्त्राचे विद्यार्थी अमित कांबळे यांनी तिच्या कुटुंबियांचे समुपदेशन केले.

सोबतच पुढील काळात कोणती काळजी घ्यायची याबाबत अवगतही केले. बिदाई कार्यक्रमाला अणे महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, सीमाची आई जनाबाई तायडे, भाऊ रवींद्र तायडे, नंददीपचे संदीप आणि नंदिनी शिंदे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा…भंडारा : वाघ पाहण्याची उत्सुकता; तुफान गर्दी अन् पोलिसांवरच …

नंददीप ही संस्था बेघर मनोरुग्णांना आधार देत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवित आहे. सध्या निवारा केंद्रात १३५ च्या वर मनोरूग्ण आहेत. यात ८७ पुरुष, तर ४८ स्त्रिया आहेत. आतापर्यंत ६५० मनोरुग्ण येथे दाखल झाले होते. त्यापैकी ५२१ मनोरुग्णांचे यशस्वीपणे पुनर्वसन करण्यात आले आहे.

उपचारानंतर जे रुग्ण बरे होतात, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना घरी घेवून जाण्याची विनंती करण्यात येते. पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णाला नेपाळसह भारतातील विविध राज्यात आतापर्यंत त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती नंददीप फाऊंडेशनचे संदीप शिंदे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psychopath woman started wandering as a police and intimidating villagers nrp 78 sud 02