समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे आज थाटात लोकार्पण होत असतानाच देऊळगावराजा तालुक्यातील पळसखेड मलकदेव येथे मात्र समृद्धी महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आजपासून जिल्ह्यातून जाणारा मार्गही वाहतुकीस मोकळा करण्यात आल्याने संभाव्य दुर्घटना लक्षात घेता आंदोलनस्थळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>VIDEO: “मला जाणूनबुजून काही लोकांचा उल्लेख करायचा आहे”, मोदींसमोर फडणवीसांकडून चारजणांचा खास उल्लेख
महामार्गाच्या भिंतीलगत कंत्राटदाराने कच्चा रस्ता सोडलेला असून तो पक्का करण्यात यावा व नालीवर पूल करण्यात यावा, या मागणीसाठी उपोषणकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे युवा नेते मनोज कायंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उद्धव मस्के यांनी आज शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनीही चर्चा केली. मात्र, तोडगा न निघाल्याने समस्या मार्गी लागेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.
हेही वाचा >>>“शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही,” मोदींची विरोधकांवर जोरदार टीका, म्हणाले “आमदनी अठन्नी खर्चा रुपैया…”
काय आहे समस्या?
देऊळगाव राजापासून सहा किलोमीटर अंतरावरून समृद्धी महामार्ग जात आहे. याचे विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर इंटरचेंज आहे. त्या इंटरचेंजच्या बाजूला पळसखेड मलक देव येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. मुख्य मार्गाचे काम झाल्यानंतर दोन्हीकडील शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात गेल्या आहेत. या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी नाल्याखालून पूर्वी जुना गाडी रस्ता होता. या रस्त्याचे डांबरीकरण करून देण्याच्या मागणीसाठी यापूर्वी आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकाराने जिल्हा व राज्यस्तरावर बैठका झाल्या आहे. परंतु मार्ग निघाला नाही. पळसखेड मलकदेव शिवारातील शेतजमिनी समृद्धी महामार्गाने बाधित झाल्या आहे. उर्वरित शेतीमध्ये जाण्यास व येण्यास दहा फूट कच्चा रस्ता सोडला आहे. यामुळे पावसाळ्यात शेतात जाण्यास व येण्यास अडथळा निर्माण होतो. टोलनाक्याला खेटून नालीचे बांधकाम केलेले नाही. पावसाळ्यात नदीचे पाणी येत असल्यामुळे रस्त्यात सुद्धा पाणी साचते. त्यामुळे नालीचे व दहा फूट रस्त्यांचे डांबरीकरण किंवा सिमेंटचे सर्व रस्ते तयार होणे अत्यंत आवश्यक आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.