परिवहन खात्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह
नागपूर : समृद्धी महामार्गावर ३० जूनच्या मध्यरात्री विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस क्रमांक एमएच- २९, बीई १८१९ ला अपघात होऊन २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या जळून राख झालेल्या बसचे दुसऱ्या दिवशी १ जुलैला प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढले गेल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे जळालेल्या बसची तपासणी झाली कशी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
२४ जानेवारी २०२० रोजी यवतमाळ आरटीओ कार्यालयात या बसची नोंदणी झाली. १० मार्च २०२३ रोजी नव्याने योग्यता प्रमाणपत्र मिळाले. बसचा परवाना २०२५ पर्यंत वैध आहे. अपघातावेळी परिवहन खात्याच्या प्राथमिक तपासणीत बसची पीयूसी ३० जून २०२३ रोजी वैध नव्हती. परंतु, ३ जुलैला एम- परिवहन अॅपवर ‘पीयूसी’ ३० जून २०२४ पर्यंत वैध दिसत आहे.
ही ‘पीयूसी’ १ जुलै २०२३ रोजी काढल्याचे पुढे येत आहे. ३० जूनच्या मध्यरात्री बस जळाली असताना दुसऱ्या दिवशी ही बस यवतमाळमधील संबंधित ‘पीयूसी’ केंद्रावर गेली कशी, तेथे तिला कुणी तपासले, प्रमाणपत्र कसे मिळाले, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकारामुळे राज्यात विना वाहन तपासणी ‘पीयूसी’ प्रमाणपत्र दिले जाते का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
‘पीयूसी’ काढण्याची पद्धत
मोटार वाहन कायद्यानुसार, वाहन चालवताना आर.सी. बुक, वाहन चालवण्याचा परवाना, विमाविषयक कागदपत्रांसह पीयूसी प्रमाणपत्र सोबत असायलाच हवे. हे प्रमाणपत्र शासनमान्य केंद्रामार्फत वाहनांची तपासणी केल्यानंतरच दिले जाते. त्यासाठी तपासणीवेळी संबंधित वाहन केंद्रावर हजर असणे आवश्यक असते.
अपघातानंतरच्या तपासणीत या बसची ‘पीयूसी’ मार्च २०२३ रोजी संपल्याचे पुढे आले होते. परंतु, १ जुलै २०२३ रोजी बसची ‘पीयूसी’ यवतमाळच्या केंद्रातून निघाल्याचे सांगितले जातेय. हे गंभीर आहे. तातडीने संबंधित केंद्राची मान्यता रद्द केली जाईल.- ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ.