अकोला : परदेशात होणाऱ्या निर्यातीत डाळी व कापसाच्या उत्पादनांचा मोठा वाटा आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत डाळ व कापूस पिकांचा समावेश करून कृषी प्रक्रिया, उत्पादन व निर्यात वाढवण्याचा प्रयत्न उद्योग प्रशासनाकडून होत आहे. जिल्ह्यातून वर्षभरात ३०७ कोटी रुपयांची विविध उत्पादने निर्यात करण्यात आली. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याच्या निर्यातीचे प्रमाण अल्प आहे. जिल्ह्यातील निर्यातीमध्ये मुख्यत्वे डाळी व कापूस उत्पादनांबरोबरच औषधे, सोया मिल, स्टील उत्पादनांचा समावेश आहे.
जिल्ह्यातून गतवर्षी चीन, बांगलादेश, श्रीलंका, इथिओपिया, नेपाळ, युनायटेड अरब अमिरात, व्हिएतनाम, युगांडा, केनिया आदी देशांमध्ये विविध उत्पादनांची निर्यात झाली. गतवर्षी अमरावती विभागातून निर्यातीत दोन हजार कोटींहून अधिक उलाढाल झाली. त्यात जिल्ह्याचा वाटा जवळजवळ १४ टक्के आहे. निर्यात वाढवण्यासाठी प्रशासनाकडून कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना, उद्योजकांना नव्या निर्यात संधींबाबत मार्गदर्शन, कार्यशाळा, टपाल विभागातर्फे निर्यात केंद्र आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
हेही वाचा…भंडारा : कोट्यवधींचा ट्रॅक्टर घोटाळा उघड ; सबसिडीच्या नावावर शेकडो आदिवासींची फसवणूक
जिल्ह्याचे भौगोलिक स्थान, जमीन व वातावरण कापूस व डाळवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे. डाळींत तूर, उडीद, मूग आदींचे उत्पादन घेतले जाते. अकोला, अकोट व मूर्तिजापूर हे डाळ पिकांचे हब मानले जातात. कृषी उत्पादनात कापूस हे मुख्य पीक आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड जिल्ह्यात प्राधान्याने होते. त्यानंतर डाळीचे उत्पादन घेतले जाते. कापसाचे उत्पादन देखील अकोला, अकोट व बोरगाव मंजू भागात अधिक प्रमाणात होते. या पिकांनुसार जिल्ह्यात कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग विस्ताराची शक्यता आहे. कापसाचे धागे, गाठी, कापड अशा उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जिल्ह्यात २५ हून अधिक जिनिंग-प्रेसिंग उद्योग आणि जवळजवळ ३० डाळ मिल आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत (जेएनपीटी) उत्तम रस्ते जोडणी, तसेच जिल्ह्यात चार मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यामुळे कापूस व डाळ पिकांचे एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत समावेश करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
हेही वाचा…सतीची मूर्ती असलेले देशातील एकमेव मंदिर आहे या जिल्ह्यात
नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न
नवउद्योजकांना ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत प्रयत्न होत आहेत. कृषी उद्योग, फळ प्रक्रिया आदींसाठी शासन व बँकांतर्फे विविध योजना राबवल्या जातात. प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याबरोबरच संभाव्य खरेदीदारांना स्थानिक उत्पादकांशी संपर्क साधण्याची व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा उपक्रमाचा उद्देश आहे.