तूरडाळ महागल्याने त्याचे चटके शाळकरी मुलांनाही जाणवू लागले असून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अमरावती जिल्हा परिषदेने तूरडाळीऐवजी मुगाच्या डाळीचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. मुलांच्या ताटातून तूरडाळ हिरावून घेण्यामागे बाजारातील निकृष्ट दर्जाच्या तूरडाळीचे निमित्त पुढे करण्यात आले असले, तरी या डाळीचे चढे दर त्यासाठी कारणीभूत ठरले आहेत.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत पाचवीपर्यंतच्या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त व सहावी ते आठवीपर्यंतच्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो. अन्न शिजवण्यासाठी दरदिवशी प्रतिलाभार्थी ३.५९ आणि ५.३८ रुपये खर्च दिला जात होता. आता त्यात केंद्र सरकारने ५ टक्के दरवाढही केली आहे. ग्रामीण भागातील शाळास्तरावर शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पाककृतीच्या अंमलबजावणीत २०११ च्या शासन निर्णयानुसार तूरडाळीचा समावेश करण्यात आला होता, पण पुरवठादाराने दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बाजारात तूरडाळीचा दर्जा चांगला नसल्याचे कारण समोर करून तूरडाळीऐवजी मुगाच्या डाळीचा पाककृतीत समावेश करण्यास परवानगी मागितली. धान्याच्या पुरवठय़ाची जबाबदारी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून मंजुरी मागितली होती. जिल्हा परिषदेने त्यासाठी नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. आता शाळकरी मुलांना तूरडाळीच्या खिचडीऐवजी मुगडाळीची खिचडी मिळणार आहे. शालेय पोषण आहारात वैविध्य असावे, अशी अपेक्षा असताना एकीकडे खिचडी खाऊन कंटाळलेले विद्यार्थी आणि दुसरीकडे शिकवण्यासोबत आहार बनवण्याकडे लक्ष देण्याच्या कामामुळे वैतागलेले शिक्षक, असे जिल्ह्यातील चित्र आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा व विशेषत: दुर्गम भागातील शाळा मुलांना खाण्यासाठी लागणारा खिचडी, भात शाळेतच शिजवतात. गावातीलच महिला बचत गट किंवा संस्थांकडूनच खिचडी शिजवून घेतली जाते. काही शाळांमध्ये तर कॅटर्सच नेमण्यात आले आहेत. कंत्राटदारांकडून शाळेतील पटसंख्येच्या प्रमाणात तांदूळ, तेल, डाळ, मीठ, मिरचीसह आवश्यक तो माल ठराविक दिवशी पोहोचता केला जातो. गेल्या काही महिन्यांमध्ये तूरडाळीचे भाव प्रचंड कडाडले आहेत. गेल्या तीन दिवसांत दरांमध्ये काहीशी घसरण झाली असली, तरी अजूनही १८० ते १६० रुपये किलो दराने तूरडाळीची विक्री होत आहे. संबंधित पुरवठादाराने बाजारात चांगल्या दर्जाची तूरडाळ उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले असले, तरी सणासुदीच्या काळात महागलेली तूरडाळ पुरवणे शक्य होणार नाही, हे ओळखून मुगडाळीचा पर्याय स्वीकारल्याचे दिसून येत आहे. या दोन डाळींच्या प्रथिनमूल्यांमध्ये फरक नसला, तरी चवीत फरक आहे. शालेय पोषण आहार योजनेत वापरले जाणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असते, असे आक्षेप अनेकदा घेण्यात येतात. दुर्गम भागात तर त्यावर लक्ष ठेवणारेही कुणी नाही, अशा परिस्थितीत तूरडाळ चांगली नाही, म्हणून मुगडाळ वापरण्याचा हट्ट बालकांना पचणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अमरावती जिल्ह्य़ात विद्यार्थ्यांच्या ‘माध्यान्ह’ भोजनातून तूरडाळ गायब!
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अमरावती जिल्हा परिषदेने तूरडाळीऐवजी मुगाच्या डाळीचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 25-10-2015 at 02:03 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pulses missing from students midday meal in amravati district