मध्य रेल्वेने पुणे आणि अमरावतीकर प्रवाशांसाठी आणखी एका रेल्वेची व्यवस्था केली असून ०१४५२ क्रमांकाची विशेष एक्स्प्रेस पुण्याहून येत्या १७ एप्रिल रोजी रवाना होणार आहे. तर ०१४५१ क्रमांकाची अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस १८ एप्रिलपासून धावणार आहे. या साप्ताहिक रेल्वेगाडीमुळे उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. येत्या १३ एप्रिलपासून या रेल्वेगाडीचे बुकिंग खुले होणार आहे. २७ जूनपर्यंत या विशेष एक्स्प्रेस उपलब्ध आहेत.
पुणे आणि अमरावती या दोन शहरांपर्यंत प्रवास करण्यासाठी १३ एक्स्प्रेस गाड्यांची सेवा उपलब्ध असली, तरी त्यातील महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि आझाद हिंद एक्स्प्रेस या दोनच गाड्या दररोज धावणाऱ्या आहेत. इतर सर्व गाड्या साप्ताहिक किंवा द्विसाप्ताहिक आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकावरून बहुतांश गाड्या उपलब्ध आहेत. मात्र अमरावती रेल्वे स्थानकावरून दोनच गाड्या रवाना होता. ०१४४० क्रमांकाची अमरावती- पुणे विशेष गाडी ही हिंगोली, पूर्णा, लातूर, कुर्डूवाडीमार्गे पुण्याला पोहचते. या प्रवासासाठी १७ तास लागतात. दुसरी २२११८ क्रमांकाची अमरावती-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस ही मनमाड, दौंड मार्गे असली, तरी ती संपूर्ण वातानुकूलित आहे. त्यामुळे अमरावतीहून पुण्यासाठी नियमित एक्स्प्रेस गाडी सुरू व्हावी, अशी प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे.
हेही वाचा >>>नागपूर : महाराष्ट्रदिनाचा निषेध म्हणून उमरेड परिसरातून देशभरात जाणारा कोळसा रोखणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची घोषणा
मध्य रेल्वेने आता विशेष रेल्वेगाडी सुरू केली असली, तरी साप्ताहिक आहे. ०१४५२ क्रमाकांची पुणे-अमरावती एक्स्प्रेस १७ एप्रिलपासून दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ०७.५५ वाजता सुटेल आणि मंगळवारी सकाळी ११.०० वाजता अमरावती रेल्वे स्थानकावर पोहचेल. परतीसाठी ०१४५१ अमरावती-पुणे एक्स्प्रेस १८ एप्रिलपासून दर मंगळवारी अमरावतीहून सायंकाळी ०५.५५ वाजता सुटेल आणि बुधवारी ०६.३० वाजता पुणे स्थानकावर पोहचेल. या रेल्वेगाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर हे थांबे देण्यात आले आहेत.