वर्धा: पुणे येथील सेवाभावी संस्था ‘दक्षणा’ तर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई तसेच नीट साठी शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच आयआयटी , एनआयटी, एम्स तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रशिक्षण मदत मिळते. दरवर्षी किमान सहाशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आतापर्यंत सात हजारावर विद्यार्थ्यांना ती मिळाली आहे.
एक वर्षाच्या विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्तीत पूणे येथील दक्षणा व्हॅलीत प्रशिक्षण, भोजन व निवास व्यवस्था केली जाते. यात प्रवेश मिळण्याचे काही निकष आहेत. विद्यार्थ्यांची निवड चाचणी द्वारे केल्या जाते.सरकारी किंवा अनुदानित शाळेत २०२३-२४ या वर्षात विज्ञान शाखेत प्रवेश असलेले विद्यार्थी चाचणी साठी पात्र आहेत.त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
हेही वाचा… रुक्मिणी हरणाशी आहे अमरावतीच्या अंबादेवी मंदिराचा संबंध! काय आहे आख्यायिका, जाणून घ्या…
३१ ऑक्टोंबर पर्यंत संस्थेच्या वेबसाईट वर अर्ज करायचा आहे. ही नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक मिळेल. तसेच ३० मिनिटाच्या अभियोग्यता चाचणीस उपस्थित राहण्यास ई मेल मिळणार. यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलवले जाणार आहे. याचा लाभ अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांना घेता यावा म्हणून शिक्षणाधिकारी कार्यालयाने प्रयत्न करावा, असे शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सूचित केले आहे.