वर्धा : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेल्या महिलांच्या कुस्ती अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी स्पर्धा शनिवारी रात्री आटोपल्या. त्यानंतर पुरस्कार वितरण झाले. या वर्षी महाराष्ट्र केसरीचा बहुमान पुणे येथील भाग्यश्री फंड यांनी पटकवला. त्यांनी कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांना चीत केले. फंड यांनी चार विरुद्ध दोन गुणांनी ही बाजी मारली. ही लढत अतिशय चुरशीची ठरली. दोन्ही महिला मल्ल चांगल्याच झुंजल्या. डावपेचची उधळण झाली. बांगडी, पट, ढाग, कलाजंग व अन्य डाव कुस्तीप्रेमीचे लक्ष वेधणारे ठरले. तिसरे स्थान कोल्हापूर येथील वेदिका सार व चौथे स्थान जळगाव येथील ज्योती यादव हिने पटकवले. रात्री उशिरा स्पर्धा चालल्या.
देवळी येथील खासदार रामदास तडस स्टेडियमवर या महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध गटांत काहींनी बाजी मारली. ५० किलो वजनगटात प्रथम कोल्हापूरची नंदिनी साळोखे व द्वितीय कोल्हापूरची रिया ढेंगे, ५३ किलो गटात स्वाती शिंदे कोल्हापूर, ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे, ५५ किलो गटात सिद्धी ढमढेरे पूणे व साक्षी चंदनशिवे सांगली, ५७ किलो गटात तन्वी मगदूम कोल्हापूर व अश्लेषा बागडी सोलापूर, ५९ किलो गटात धनश्री फंड अहिल्यानगर व गौरी पाटील कोल्हापूर, ६२ किलो गटात वैष्णवी पाटील कल्याण व संस्कृती मुमुळे सांगली, ६५ किलो गटात सृष्टी भोसले कोल्हापूर व सुकन्या मिठारी कोल्हापूर, ६८ किलो गटात शिवानी मेटकर व शिवांजली शिंदे, ७२ किलो गटात वैष्णवी कुशाप्पा कोल्हापूर व गौरी धोटे अमरावती यांनी पुरस्कार जिंकले.
पुरस्कार वितरण प्रसंगी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे, आमदार राजेश बकाने, प्रताप अडसड, सुमित वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. आयोजक माजी खासदार रामदास तडस यांनी या राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा आयोजनासाठी शासनाने दरवर्षी २५ लक्ष रुपये देण्याची मागणी केली. तो धागा पकडून मंत्री बावनकुळे म्हणाले की या मागणीचा अवश्य विचार करू. किमान दहा लाख रुपये शासनाकडून मिळतील, असा प्रयत्न करू. राज्यात तालुकास्थळी असे भव्य व देखणे स्टेडीयम पाहण्यात आले नाही, अशी प्रशस्ती त्यांनी दिली.
कुस्ती रसिकांनी दोन्ही दिवस भरभरून प्रतिसाद दिला. भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, नंदू वैद्य, मदन चावरे, एसडीओ दीपक कारंडे प्रामुख्याने उपस्थित होते.