भंडारा : पुण्यात तरुणीवर अत्याचाराची घटना घडली मात्र या घटनेवरून महिला सुरक्षित नाहीत असे म्हणता येणार नाही, कारण अशा घटना घडत राहतात असे वादग्रस्त वक्तव्य भंडाऱ्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी असे विधान केले.
महाराष्ट्रात दररोज नवनवीन मोठमोठ्या घटना घडत असून महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे असाच प्रकार पुण्यात घडला असून महिलेवर अत्याचार करण्यात आला मात्र अद्यापही आरोपी फरार आहे यावर बोलताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे म्हणाले की महाराष्ट्रमध्ये महिला सुरक्षित नाहीत असे म्हणता येणार नाही, घटना घडतच असतात त्याच्यावर सातत्याने कारवाई चालू असते सर्वजण सुरक्षित राहिले पाहिजे यात महिला असो किंवा पुरुष गुन्हेगारी वृत्ती कुठे ना कुठे असते त्यामुळे शासन कारवाई करीत असते असे पालकमंत्री आणि भाजप नेते संजय सावकारे म्हणाले.
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणात केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका होत आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावकारे यांचे कान टोचले असून अशा प्रकरणांत बोलताना मंत्र्यांनी संवेदनशीलता बाळगावी असा सल्ला देखील फडणवीस यांनी दिला आहे.