अमरावती : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्यांचे मूळ गाव चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर. अनेकवेळा ते आपल्या गावी येत होते. गावातील प्रत्येक कुटुंबाला आपल्यातील माणूस गेल्याचे दु:ख झाले आहे. गिरीश बापट यांची सावंगी मग्रापूर येथे शेती आहे. त्यांनी गावी शेती करण्यासोबतच २०१७ मध्ये वात्सल्य गोशाळा आणि गोवंश संशोधन केंद्राची उभारणी केली. सुमारे ४२ एकर क्षेत्रात हे केंद्र विस्तारलेले आहे. या केंद्रात आजही कार्य सुरू आहे. या ठिकाणी भाकड गोवंशाची निगा राखण्यासोबतच देशी गायींच्या वंशवृद्धी आणि संगोपनाचे कार्य केले जाते.
हेही वाचा >>> टेल्को कंपनीत कामगार ते खासदार; गिरीश बापट यांची कारकिर्द
गिरीश बापट यांच्या आई प्रतिभा यांचे माहेर देखील अमरावती जिल्ह्यातीलच आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातीलच सोनोरा भिलटेक येथील जोशी घराण्यातल्या. बापट यांचे एक मामा बाळासाहेब जोशी हे चांदूर रेल्वे येथे तर दुसरे मामा यशवंतराव जोशी हे बडनेरा येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे चुलत बंधू विश्राम बापट अमरावतीत राहतात.
हेही वाचा >>> तीन महिन्यांत भाजपने गमावले पुण्यातील तीन मोठे नेते!
सावंगी मग्रापूर येथे त्यांची सुमारे ३० एकर शेती असून ते शेती देखील पाहत होते. त्यांचे कार्यक्षेत्र पुणे असले, तरी ते वर्षातून दोन ते तीन वेळा गावी येत होते. मूळ गावाची त्यांना ओढ होती. सावंगी येथे त्यांचा वडिलोपार्जित वाडा आहे. त्यांना शेतीची आवड होती. गिरीश बापट यांचे वडील भालचंद्रराव हे कँटोनमेंट बोर्डात नोकरीला होते. बदली होऊन ते पुण्यात गेले आणि तेथेच ते स्थायिक झाले. मात्र, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने सावंगी मग्रापूरशी असलेली नाळ तुटू दिली नाही. अमरावतीच्या संत गाडगेबाबा रक्तपेढीच्या स्थापनेची मूळ संकल्पना त्यांचीच होती. त्यांनी या रक्तपेढीच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले, अशी माहिती बापट कुटुंबीयांचे निकटवर्तीय सोपान गोडबोले यांनी दिली. पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते अमरावतीतील अनेक राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. ज्येष्ठ नेते बी.टी. देशमुख, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे यांची ते आवर्जून भेट घेत असत. दिवंगत नेते रा.सु. गवई यांचे स्मारक अमरावतीत उभे व्हावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता, अशीही आठवण गोडबोले यांनी सांगितली.