पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ६९ वाहन प्रशिक्षण संस्था अनधिकृतपणे सुरू आहेत, असे सांगत परवान्याची मुदत संपुष्टात आल्यानंतरही त्याचे नूतनीकरण न करणाऱ्या वाहन प्रशिक्षण संस्थांचे परवाने रद्द करण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. दोन्ही शहरांत एकूण ५०३ संस्था असून, सद्य:स्थितीनुसार त्यातील निम्म्या संस्थांचा परवाना रद्द होऊ शकतो, असे स्पष्ट झाले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था अनधिकृतपणे सुरू आहेत, या विषयाकडे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून विधानसभेचे लक्ष वेधले. दोन्ही शहरांतील किती वाहन प्रशिक्षण संस्था परवान्याची मुदत संपल्यानंतरही सुरू आहेत, अशा संस्थांवर शासनाने काय कारवाई केली, असे प्रश्न जगताप यांनी अधिवेशनात उपस्थित केले.

हेही वाचा : पिंपरी : रस्त्यांवरील खड्ड्यांत झाडे लावून उद्योजक, कामगारांचे आंदोलन

त्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ६९ वाहन प्रशिक्षण संस्थांची मुदत संपली असून नूतनीकरण न करताही त्या सुरू आहेत. २१६ मोटार प्रशिक्षण संस्थांचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.पुणे कार्यालयाच्या अभिलेखावर मंजूर वाहन प्रशिक्षण संस्थांची एकूण संख्या ५०३ आहे. यापैकी २८७ संस्थांना सारथी प्रणालीवर ‘लॉगीन आयडी’ देण्यात आले आहे. २८७ पैकी २१८ मोटार संस्थांचा परवाना वैध आहे.

हेही वाचा पुणे : स्वप्नमहालातील हलत्या झोपाळ्यावर मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची होणार प्रतिष्ठापना

उर्वरित ६९ मोटार संस्थांची मुदत संपलेली आहे. त्यांनी अद्याप नूतनीकरण केलेले नाही. अशांना नूतनीकरणासाठी नोटिस बजावण्यात आली आहे. २१६ मोटार प्रशिक्षण संस्था बऱ्याच कालावधीपासून बंद आहेत. त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

Story img Loader