लोकसत्ता टीम
वर्धा: अनाथांची आई अशी जगभर ओळख लाभलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची वर्धा ही जन्मभूमी. इथे सामाजिक कार्याची सुरुवात केल्यानंतर त्यांची इतरत्र भ्रमंती सुरू झाली. पुणे जिल्ह्यात सासवड येथे त्यांनी बाल सदन सुरू करीत अनेक अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यांच्या मृत्यूपश्चात हे कार्य सुरूच आहे. या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील मंडळी भेट देत असतात. यावेळी जिल्ह्यातील दोनशे वारकरी आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडीत सहभागी झाले आहेत.
माईंचे मानसपुत्र दिपकदादा गायकवाड हे सुध्दा माईंची आदरातिथ्य करण्याची परंपरा पुढे चालवीत आहे. वर्धा येथील वारकरी पालखी कवडूजी कठाने, गौरव महाराज ठाकरे शुभम महाराज फुलभोगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या बाल सदनात दोन दिवस मुक्काम केला. त्यांना पुरणपोळीचा पाहुणचार झाला.
हेही वाचा… नागपूर : “कुठल्याही पदाची मागणी केली नाही, कार्यकर्ता म्हणून काम करणार”; आशीष देशमुख म्हणतात…
तसेच शाल श्रीफळ देवून ममता सपकाळ, सुजाता गायकवाड, ज्योती सिंधुताई सपकाळ, स्मिता पानसरे यांनी सत्कार केला. मुलामुलींनी फुगडी खेळत माऊलीचा जागर केला. माहेरून आलेले वारकरी या स्वागताने चांगलेच भारावून गेल्याचे चित्र उमटले.