गडचिरोली : गडचिरोली वनविभागात शामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या साहित्य खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष योगाजी कुडवे यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.
शामाप्रसाद मुखर्जी योजनेतून गडचिरोली वनविभागात येणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत वाटरबम, ईलेक्ट्रिक ऑटो, केजवील, रोटावेटर, शेतीचे साहित्य, थ्रेशर मशीन व इतर साहित्य खरेदी करण्यात आले. ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. परंतु खरेदी करण्यात आलेल्या साहित्यांचे मूल्य बाजार भावापेक्षा दुप्पट असल्याचा दावा निवेदनात केला आहे. यातील काही साहित्यांची गरज नसताना वन व्यवस्थापन समिती व वनरक्षकावर दबाव टाकून खरेदी करण्यात आली. वनसमितीतील सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित न केल्यास मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सरपंच परिषदेचे अध्यक्ष योगाजी कुडवे, नीळकंठ संदोकर, रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम, आकाश मट्टामी यांनी दिला आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी उपवनसंरक्षक मिलिष शर्मा यांना संपर्क केला असता ते बैठकीत असल्याने उपलब्ध होऊ शकले नाही.
हेही वाचा – नागपूर : राज्यात प्रथमच बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; तब्बल ५८ आरोपी
खरेदीत गौडबंगाल
या योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या साहित्यांचे बाजार मूल्य अर्धे आहेत. त्यातील काही साहित्यांची तुलना केल्यास हे स्पष्ट होते. यात रोटावेटर २ लाख ३० हजारात घेण्यात आले. याचे बाजार मूल्य १ लाख ३५ हजार इतके आहे. रिवसेबल ब्लाऊ पलटी नांगर १ लाख ५० हजारात घेण्यात आले. याचे बाजार मूल्य ८० हजार आहे. पेरणी यंत्र २ लाख २५ हजारात खरेदी केले. याचे बाजारमूल्य केवळ ७५ हजार आहे. इलेक्ट्रिक रिक्षा ४ लाख २५ हजारात घेण्यात आला. याचे बाजारमूल्य १ लाख ७५ हजार आहे. तर ४ लाख ८० हजारात घेण्यात आलेल्या थ्रेशर मशीनचे बाजारमूल्य २ लाख ६० हजार इतके आहे. अशाप्रकारे अनेक साहित्य खरेदी करण्यात आल्याचा दावा कुडवे यांनी केला आहे.