बुलढाणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याऐवजी बहुजनांची ‘प्रति आरएसएस’ निर्माण करावी आणि नरेंद्र मोदींचा पर्याय शोधावा, असे आवाहन, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. संघटनेच्या वतीने नजीकच्या ‘जिजाऊ सृष्टी’ येथे आयोजित जिजाऊ जयंतीच्या मुख्य सोहळ्यात मुख्य मार्गदर्शन करताना त्यांनी हे आवाहन केले.
पूर्वीच्या वक्त्यांनी ‘आरएसएस’वर केलेल्या टीकेचा धागा धरून ते म्हणाले की, त्यांच्यावर फक्त टीका करू नका. याउलट त्यांच्यापेक्षा बळकट अशी बहुजनांची संघटना तयार करा. तसेच नरेंद्र मोदींसारखा सशक्त बहुजनवादी पर्याय शोधणे काळाची गरज आहे. इतिहासाचा धांडोळा घेताना खेडेकर म्हणाले की, महाराष्ट्रावर विदर्भ व मराठवाड्याचे एकप्रकारे उपकारच आहे. विदर्भातील जाधव व मराठवाड्यातील भोसले घराणे एकत्र आले. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज घडले. पोटापाण्यासाठी नव्हे तर राज्याचे भाग्य बदलण्यासाठी ते पश्चिम महाराष्ट्रात गेले. त्यांनी क्रांती घडवली, इतिहास निर्माण केला, असे ते म्हणाले.
हेही वाचा >>>वाद टाळण्यासाठी मुनगंटीवारांचा समंजसपणा, मनोज जरांगे परतल्यानंतर घेतले जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन
निवडणुकीमुळेच राम मंदिर सोहळा
२२ जानेवारीला आयोजित राम मंदिर लोकार्पण सोहळा देशात पुरोहित शाही वाढविणारा ठरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. एरवी ‘आरएसएस’चा तिथी, पंचांग, मुहूर्त यावर भर असतो. मात्र, हिंदू पंचांगनुसार अशुभ समजल्या जाणाऱ्या पौष महिन्यात हा सोहळा ठेवण्यात आला आहे. याला निवडणूक हे कारण असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित करून २०२४ हे निवडणुकांचे वर्ष आहे. भारतच नव्हे तर जगातील ८० देशात निवडणूक होणार आहे. यामुळे बहुजनांनी अधिक सावध राहण्याची गरज असल्याचा इशारा खेडेकरांनी यावेळी दिला.