अकोला : वृत्तपत्र रद्दी दानातून गरीब-वंचितांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद पेरण्याचा अनोखा उपक्रम शहरातील सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम शिंदे गत १८ वर्षांपासून राबवत आहेत. लोकांकडून जमा झालेली रद्दी विकून आलेल्या पैशांत गरीब, वंचितांना दिवाळीचा फराळ, कपडे आणि मिठाईचे वाटप केले जाते. पुरूषोत्तम शिंदे हे आपल्या स्वराज सामाजिक संस्थेच्या वतीने हा सामाजिक उपक्रम दर दिवाळीत सातत्याने राबवित आहेत. त्यामुळे शेकडो वंचितांच्या जीवनात दिवाळीचा आनंद पसरतो.
दिवाळी आली की प्रत्येक घरी लगबग असते ती आपल्या घराच्या साफसफाईची. या साफसफाईत घरातील अडगळीच्या वस्तू, भंगार आणि रद्दी बाहेर काढली जाते. वर्षभरातील रद्दीची विक्री दरवर्षी दिवाळीच्या महिन्यातच होते. अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते पुरूषोत्तम शिंदे यांच्या हे लक्षात आल्यावर माणूसकीचा जागर करणारी एक शाश्वात चळवळ त्यांनी उभी केली. पहिल्या वर्षी पुरूषोत्तम शिंदे यांच्यासोबत फारसे कुणी नव्हते. आता तर हा विचार अकोलेकरांची आपली चळवळ आणि उपक्रम झाला आहे. दिवाळी आधीच्या महिनाभरापासून या उपक्रमाला सुरुवात होते. अकोल्यात यासाठी हॉटेल सेंटर प्लाझा, द. प्रभात बेकरी, लोकमान्य वॉच कंपनी, प्रभात किड्स स्कूल, एस्पायर संस्था, चिंतामणी मेडिकल आदी संकलन केंद्रावर रद्दी गोळा केली जाते. शहरातील अनेक शाळा, संस्था या उपक्रमाशी जुळले आहेत. रद्दी संकलनानंतर ही रद्दी विकून आलेल्या पैशांत व त्यात आणखी काही पैसे टाकून गरीब, निराधार वंचितांना दिवाळीचा फराळ, मिठाई आणि कपडे वाटप केले जातात. शहरातील जठारपेठ भागातील गजानन महाराज मंदिर परिसर, सातव चौक, जिल्हा स्त्री रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय परिसरात गरिबांना फराळ आणि कपड्यांचे वितरण करण्यात येते. यासोबतच इतरही भागात उपक्रम राबवून गरिबांची दिवाळी आनंदात साजरी केली जाते. संकलन केंद्रावर रद्दी आणून देत उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पुरूषोत्तम शिंदे यांनी केले आहे.
अकोलेकरांची ‘लोकचळवळ’
पुरूषोत्तम शिंदे यांनी २००५ मध्ये रद्दीतून वंचितांची दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम सुरू केला. तेव्हा स्वत: चारचाकी लोटगाडी शहरभर फिरवत रद्दीची अक्षरश: ‘भिक’ त्यांनी मागितली होती. अनेकांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांना सहकार्य केले, तर काहींनी पाठही फिरवली. त्यांना अपमानही सहन करावा लागला. कालांतराने त्यांच्या उपक्रमाला प्रतिसाद वाढत गेला. पुरूषोत्तम शिंदे यांचा हाच उपक्रम अकोलेकरांसाठी आता ‘लोकचळवळ’ झाला आहे.